कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये झालेल्या घोटाळ्याला जबाबदार असणारे डॉ.अशोक पोळ यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याबाबत आरोग्य उपसंचालक यांच्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तर, डॉ. हर्षला वेदक यांची बदली करण्यात आली आहे, असा खुलासा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने शुक्रवारी केला आहे. याप्रश्नी आंदोलन छेडणारे जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांना पाठविलेल्या पत्रामध्ये ही माहिती नमूद करण्यात आली आहे.     
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामध्ये मोठय़ा प्रमाणात गैरव्यवहार घडला होता. या घोटाळ्यास तत्कालीन जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.पोळ, डॉ.वेदक या मुख्यत्वे जबाबदार आहेत. त्यांच्यासह इतरांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करून जनसुराज्य शक्ती पक्षाने दीर्घकाळ आंदोलन चालविले होते, शिवाय माहिती अधिकारातही विचारणा केली होती. याची नोंद घेऊन आज आरोग्य विभागाने जिल्हाध्यक्ष पाटील यांना पत्राद्वारे कारवाईचा तपशील कळविला आहे. जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी जी.एस.काळे यांच्या चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या तत्कालीन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शर्वरी हाटवळ, उपअभियंता राजेंद्र हुजरे, जिल्हा लेखा व्यवस्थापक संध्या गायकवाड,कनिष्ठ लेखाधिकारी करकरे यांना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलासा मागितला आहे. औषध खरेदीबाबत डॉ.अशोक पोळ, आरोग्य सहायक एस.पी.मगदूम, आरोग्य पर्यवेक्षक एस.पी.जाधव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. या सर्वाना कारणे दाखवा नोटीस देऊन खुलाशाची मागणी केली आहे. २६ सप्टेंबर २०११ रोजीच्या चौकशी समितीचा अहवाल फोल ठरविणारे तत्कालीन आरोग्य उपसंचालक यांच्यावरील कारवाई बाबतचा मुद्दा शासनाशी संबंधित आहे, असे या पत्रात म्हटले आहे.     
बी.ए.एम.एस. भरती संदर्भात उमेदवारांकडून परीक्षा शुल्कापोटी जिल्हा परिषदेच्या खात्यावर १ लाख ३३ हजार रूपये जमा झाले होते. संबंधित उमेदवारांना ते परत करण्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मान्यता दिली असून हे काम सुरू आहे, असा खुलासा आरोग्य विभागाने केला आहे.