18 October 2019

News Flash

यशस्वी जीवनासाठी शिस्त हवी

जीवनात वाटचाल करताना शिस्त नसेल तर ते जीवन बेढब होते. त्याला आकार राहत नाही. त्यामुळे नवीन समस्या निर्माण होतात.

| January 17, 2015 12:02 pm

जीवनात वाटचाल करताना शिस्त नसेल तर ते जीवन बेढब होते. त्याला आकार राहत नाही. त्यामुळे नवीन समस्या निर्माण होतात. आपला चेहरा हसरा ठेवला तर समोरच्या संकटावर मात करण्याची शक्ती निर्माण होते. जीवन यशस्वी करायचे असेल तर आयुष्यात शिस्तीची गरज आहे, असे विचार मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी येथे व्यक्त केले. ओंकार शाळेच्या व्याख्यानमालेत त्या ‘मूल्यशिक्षण’ विषयावर बोलत होत्या.
आयुष्याची वाटचाल करताना अनेक संकटे येतात. ही संकटे एक संधी आहे असे समजून त्यावर मात केली तर नक्कीच यशस्वी जीवनाचे टप्पे पुढे दिसू लागतात. हेच टप्पे हळुहळू व्यक्तीला यशाच्या शिखराकडे घेऊन जातात. विचार ही शक्ती आहे. तिला चालना द्या. विचार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मेहनत घेतली तर यश आपोआप पदरात पडते. हे सर्व मिळवण्यासाठी मातृभाषा आणि श्लोकांचे महत्त्व खूप आहे. ते आत्मसात करा, असे डॉ. देशमुख यांनी स्पष्ट केले.
मुले ही समाजाचा प्रमुख घटक आहेत. या मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार केले तर एक आदर्श तरुण त्यामधून घडतो. हेच तरुण उद्याचा यशस्वी भारत घडवणार आहेत. त्यामुळे प्रत्येक आईने सकारात्मक विचार, संस्कार मुलांवर केले पाहिजेत. चांगले विचार, संस्कार, सकारात्मक विचार माणसाला ऊर्जा देतात. आरोग्य चांगले ठेवतात. राग, चिडचिड या गोष्टी निघून जातात, असे डॉ. देशमुख यांनी सांगितले. समोर येणारा प्रत्येक माणूस हा गुरू आहे असे समजून वर्तन करा. लहानमोठा असा भेदभाव त्यामध्ये करू नका. त्यामधून जीवनाचे तत्त्वज्ञान अभ्यासाला मिळते, असे त्यांनी स्पष्ट केले.

First Published on January 17, 2015 12:02 pm

Web Title: discipline must for successful life
टॅग Discipline