वेगवेगळय़ा पक्षांतल्या असंतुष्टांना पक्षात प्रवेश देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का दिला. मनसेच्या फोडाफोडीच्या राजकारणाचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसणार आहे.
राज्यातल्या वेगवेगळय़ा भागांत पक्षसंघटन वाढवण्यासाठी मनसेचे काही वरिष्ठ नेते राज्याच्या दौऱ्यावर आहेत. आमदार बाळा नांदगावकर, आमदार मंगेश सांगळे, सचिव अविनाश अभ्यंकर आदी नेते तीन दिवसांच्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर रविवारी सकाळी शहरात दाखल झाले. सकाळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर दुपारी शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अन्य पक्षांतल्या पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश देण्यात आल्याचे जाहीर केले.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावर, माजी उपजिल्हाप्रमुख दिलीप ठाकूर, नायगावचे तालुकाप्रमुख रवींद्र भिलवंडे, किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष एकनाथ ब्राह्मणवाडेकर, विभागप्रमुख गजानन सावंत, शाखाप्रमुख नितीन सरोदे, अर्जुन राठोड, मनोज ठाकरे, अजय लोकडे, रावसाहेब वडजे, गिरीश पटवारी, विद्युत कामगार सेनेचे मारोतराव टाक, युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बालाजी चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते हंसराज वैद्य व त्यांच्या कन्या डॉ. शीतल भालके यांनी आपापल्या पदाचे राजीनामे देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.
डॉ. हंसराज वैद्य हे राष्ट्रवादीतून काही काळ शिवसेनेत गेले होते. तेथे फार काळ न टिकल्याने त्यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला होता. आता मनसेत प्रवेश घेऊन ते लोकसभेच्या तयारीला लागतील अशी चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक असलेले बालाजी चव्हाण यांनी मनसेत प्रवेश केल्याने काँग्रेसच्या नेत्यांना धक्का बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस पक्षाकडे अन्य पक्षांतून येणाऱ्यांचा ओढा असताना चव्हाण यांनी मनसेत प्रवेश केला.
शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रकाश मारावार व उपजिल्हाप्रमुख दिलीप ठाकूर हे गेल्या काही दिवसांपासून असंतुष्ट होते. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी जिल्हाप्रमुखपदावर प्रकाश कौडगे व हेमंत पाटील यांची नियुक्ती केल्याने हे दोघेही प्रचंड अस्वस्थ होते. या दोघांनीही आपापल्या परीने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे कैफियत मांडली. पण त्याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. मारावार यांनी तर थेट संपर्कप्रमुखांनाच आव्हान दिले होते. आज या दोघांनी आपल्या असंख्य समर्थकांसमवेत मनसेत प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठे िखडार पडले आहे.
आमदार बाळा नांदगावकर यांनी सांगितले, की राज्यातल्या वेगवेगळय़ा भागांत आमच्या पक्षाचे संघटन योग्य पद्धतीने वाढत आहे. नव्याने पक्षात दाखल झालेल्या पदाधिकाऱ्यांमुळे पक्ष वाढण्यास मदतच होणार आहे. प्रवेश देणाऱ्यांना कोणतेही आमिष देण्यात आले नाही. पण त्यांच्यातील गुणवत्तेनुसार त्यांचा योग्य तो सन्मान केला जाईल. जिल्ह्यातल्या नियुक्त्या करताना सर्वतोपरी विचार केला जाईल. विधानसभेच्या नऊ व लोकसभेची एक जागा लढविण्याची आमची तयारी आहे. त्यादृष्टीने आम्ही आढावा घेत आहोत. तीन दिवसांच्या दौऱ्यानंतर जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा अहवाल पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.