ठाणे महापालिका प्रशासनाकडून कारवाईबाबत सापत्नपणाची वागणूक मिळत असल्याचा दावा करीत तीन वर्षांपूर्वी ऐन दिवाळीत घडलेल्या तारांगण आग दुर्घटनेप्रकरणी निलंबित अधिकारी मुनीर मुल्ला यांच्या कुटुंबीयाने महापालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांची पत्नी गोरिबा यांनी महापालिका आयुक्त आर. ए. राजीव यांनी निवेदन दिले आहे.
ऑक्टोबर २००९मध्ये तारांगणमध्ये असलेल्या पुनर्वसू या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर आग लागली होती. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलातील सहा कर्मचाऱ्यांनी लिफ्टचा आधार घेतला होता. मात्र, लिफ्टमध्ये आगीचा धूर कोंडल्याने सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. अग्निशमन दलातील ए. पी. मांडके, पी. एल. पाटील, जी. एम. झळके, एस. व्ही. देवरे आणि मुनीर मुल्ला या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणा आणि दुर्लक्षपणामुळे सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला, असा अर्ज २०१०मध्ये ठाणे न्यायालयात दाखल करण्यात आला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार या पाच अधिकाऱ्यांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने पाचजणांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता, अशी माहिती गोरिबा यांनी दिली. या घटनेप्रकरणी महापालिका प्रशासनाने केवळ पती मुनीर मुल्ला यांच्यावरच निलंबनाची कारवाई केली. उर्वरित चारपैकी दोघांना पदोन्नती दिली तर दोघांना उच्च प्रशिक्षणासाठी पाठविले. या संदर्भात गेल्या अडीच वर्षांपासून प्रशासनाकडे दाद मागूनही न्याय मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. या सर्व घटनेची निष्पक्ष चौकशी करून योग्य निर्णय द्यावा, यात पती दोषी असल्यास त्यांना शिक्षा द्यावी, तसेच दोषी नसल्यास त्यांना सन्मानपूर्वक सेवेत रुजू करून घ्यावे, अशी विनंती त्यांनी आयुक्त राजीव यांना केली आहे.