खासगी शिक्षण संस्थांमध्ये पैसे घेऊन मोठय़ा प्रमाणावर झालेली शिक्षक भरती, नुकत्याच झालेल्या टीईटी प्रश्नपत्रिकेतील त्रुटी, शिक्षण विभागाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षा देऊन बेरोजगार म्हणून डोक्यावर असणारी टांगती तलवार आदी समस्यांवर शुक्रवारी येथे झालेल्या डि.टी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशनच्या मेळाव्यात चर्चा करण्यात आली. भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी व छात्रभारतीचे अध्यक्ष अ‍ॅड. शरद कोकाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
येथील राजेबहाद्दर संकुलातील सभागृहात शुक्रवारी संघटनेचा महामेळावा झाला. अध्यक्षस्थानी भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रवींद्र सरकार व संघटनेचे अध्यक्ष संतोष मगर उपस्थित होते. यावेळी भंडारी यांनी भाजप डी.टी.एड आणि बी.एड बेरोजगार विद्यार्थ्यांच्या मागे ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. त्यांच्या समस्या पक्ष पातळीवर सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहु असे आश्वासन त्यांनी दिले. मगर यांनी संघटनेच्या माध्यमातून वेळोवेळी केलेल्या आंदोलनांची माहिती दिली. संघटना आता बेरोजगार विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरेल असा इशाराही त्यांनी दिला. खासगी संस्थामध्ये पैसे घेऊन होणाऱ्या शिक्षक भरतीवर यावेळी चर्चा झाली. मनुष्यबळ विकास विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आपल्याकडे ५० हजाराहुन अधिक जागा शिक्षक पदासाठी रिक्त असतांना शिक्षण विभाग अतिरीक्त शिक्षक असल्याचे कारण पुढे करते. यामागील भ्रष्टाचार-अर्थकारण यांचा शोध घेण्याची गरज अधोरेखीत करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या टी.ई.टी परीक्षेत सात लाखहुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. मात्र प्रश्नपत्रिकेत ३७ प्रश्न चुकीच्या पध्दतीने विचारले गेले. त्याचे कुठेही मूल्यमापन वा अवलोकन केले गेले नाही. ही परीक्षा देऊनही सीईटी द्यायची का, हा प्रश्नही अद्याप अनुत्तरीत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
नोकरभरतीच्या वेळी ‘टीईटी’साठी अनुसुचित जाती जमातीसाठी ५५ आणि खुल्यासाठी ६० गुणांची आवश्यकता आहे. हे प्रमाण अनुसुचितसाठी ४० तर खुल्या गटासाठी ४५ गुण ठेवण्यात यावे, निकालात विलंब का होत आहे याचा खुलासा संबंधित विभागाने करावा, अशी मागणी बेरोजगार विद्यार्थ्यांनी केली. प्रा. सरकार यांनी आज तरूणांनी आपल्या प्रश्नांबद्दल जागरूक असणे गरजेचे असल्याचे सांगितले. स्व कर्तृत्वावर स्वत:ला सिध्द करावे. तरूणांच्या संघटनेतून क्रांती घडू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मेळावा यशस्वितेसाठी आरती बर्वे, राणी गायकवाड, भागवत पाटील, योगेश जगताप आदी प्रयत्नशील होते.