उरण तालुक्यात पुरेसा पाणीपुरवठा नसणे, अशुद्ध व अपुरा पाणीपुरवठा आदी सारख्या समस्या तसेच विजेचा रोजचा होणारा खेळखंडोबा, धोकादायक विजेच्या तारा व खांब या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी तहसील कार्यालयात मंगळवारी झालेल्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्या सोडविण्याचा प्रयत्न एमआयडीसी व महावितरणकडून केला जाईल, असे आश्वासन या वेळी या दोन्ही आस्थापनांच्या अधिकाऱ्यांनी दिलेले आहे.
उरण सामाजिक संस्थेच्या पुढाकारामुळे उरण तालुक्यातील वीज व पाणी या दोन मुख्य प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी उरण तहसील कार्यालयात तहसीलदार नितीन चव्हाण यांनी बैठक  बोलाविली होती. या वेळी एमआयडीसीचे उपअभियंता एम.के.बोधे, महावितरणचे साहाय्यक अभियंता उपेंद्र सिन्हा यांच्यासह उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सचिव संतोष पवार, भूषण पाटील, उपाध्यक्ष काशिनाथ गायकवाड, संजय ठाकूर, गोपाळ पाटील आदीजण उपस्थित होते. या बैठकीत उरण तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील मातीचा साचलेला गाळ साफ करणे, धरणाची उंची वाढवून पाणी साठय़ात दुप्पट वाढ करण्यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर करणे, तालुक्यात वीज उत्पादन होत असतांनाही येथील नागरिकांना देयके वेळेत भरूनही वारंवार वीज न मिळणे, धोकादायक विजेच्या तारा व खांब बदलणे, वीजपुरवठा नियमित करण्यासाठी प्रस्तावित वीज उपकेंद्राची तातडीने उभारणी करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.