शिस्त हा चारित्र्य संवर्धनाचा मुख्य बिंदू असून विद्यार्थिदशेत मिळणाऱ्या सैन्य प्रशिक्षणाचा केवळ सैन्यच नव्हे तर, इतर क्षेत्रांतही उपयोग होऊ शकतो, असे प्रतिपादन निवृत्त ब्रिगेडियर विलास देवगिरीकर यांनी केले. डॉ. बा. शि. मुंजे यांच्या १४२व्या जयंतीच्या पाश्र्वभूमीवर येथील भोसला सैनिकी शाळेत आयोजित संचलनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
रामदंडी कॅप्टन अवधूत पाटील यांच्या नेतृत्वाखाली ६०० विद्यार्थ्यांनी या वेळी संचलन केले. नव्याने समाविष्ट झालेल्या सहा घोडय़ांसह स्वार पथकानेही संचलनात सहभाग घेतला. देवगिरीकर यांचा परिचय भोसला सैनिकी शाळेचे कमांडर सारंग काशीकर सारंग यांनी करून दिला. प्रास्ताविकात मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाचे कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर यांनी सैन्यात प्रवेश करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वेगळे असे मार्गदर्शन केंद्र भोसला करिअर अ‍ॅकॅडमी येत्या शैक्षणिक वर्षांपासून सुरू करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमासाठी शाळेच्या १९८२ ते ८५ दरम्यानच्या विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भोसला सैनिकी महाविद्यालयाचे सहा विद्यार्थी, सात विद्यार्थिनी आणि प्रशिक्षक यांनी नुकताच जम्मू-काश्मीरचा अभ्यास दौरा पूर्ण केला. या दौऱ्यानिमित्ताने आलेल्या अनुभवावर आणि निरीक्षणावर आधारित अहवालाचे प्रकाशन ब्रिगेडियर देवगिरीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, उपाध्यक्ष नारायण दीक्षित, कार्यवाह दिलीप बेलगावकर आणि सहकार्यवाह आशुतोष रहाळकर, कमांडंट सारंग, मुख्याध्यापक आणि भोसला महाविद्यालयाचे प्राचार्य उपस्थित होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रावीण्य मिळविलेले खेळाडू अंजना ठमके, संजीवनी जाधव यांसह त्यांच्या प्रशिक्षकांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.