श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट ही ‘मोफत अन्नदान’ करीत असताना दरवर्षी प्रकाशित करीत असलेली दिनदर्शिका ही सर्व जनतेसाठी मार्गदर्शक ठरेल, असे उद्गार श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांनी येथे काढले. या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून मधुरिमाराजे छत्रपती, हर्षदा मेवेकरी, विक्रम जरग, नगरसेवक बनछोडे व माजी महापौर हरिदास सोनवणे उपस्थित होते.    
श्रीमंत छत्रपती शाहूमहाराज यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांना शुभेच्छा देत असताना श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टतर्फे वार्षिक दिनदर्शिका सन २०१३चे प्रकाशन करण्याचा समारंभ आयोजित केला होता. या समारंभास कोल्हापूरच्या महापौर जयश्री सोनवणे या उपस्थित होत्या, तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मालोजीराजे छत्रपती होते.    
या समारंभाचे स्वागत श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी केले. ए. के. कुलकर्णी यांनी सर्वाना अन्नछत्राबाबतची प्रगती व माहिती दिली. याप्रसंगी मेवेकरी यांनी सांगितले, की चालू वर्षांत दहा हजारांहून अधिक दिनदर्शिका मोफत वितरित केल्या जाणार आहेत. या दिनदर्शिकेसाठी हीरो कंपनीचे अधिकृत विक्रेते एस. एम. घाटगे अ‍ॅन्ड सन्सचे दिलीपराव घाटगे यांचे बहुमोल सहकार्य लाभल्याचे सांगितले. हा समारंभ छत्रपती शाहू हायस्कूल या ठिकाणी पार पडला.
या वेळी संजय जोशी, अशोक मेवेकरी, राजेश सुगंधी, गिरीश कुलकर्णी, शरद काकिर्डे, पिंटू मेवेकरी आदी उपस्थित होते.