आत्ताच्या पिढीला ‘हुतूतू’, ‘लपंडाव’, ‘आंधळी कोशिंबीर’, विटी दांडू’ आदी खेळांची नावे फक्त ऐकूनच माहिती असतील. काही अपवाद वगळता हल्लीची मुले हे खेळ फारसे खेळलेही नसतील. एके काळी खास उन्हाळी सुट्टीसाठी प्रसिद्ध असलेल्या या खेळांच्या नावाने सध्या काही मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत तर काही होण्याच्या मार्गावर आहेत.
‘भातुकली’ हा चित्रपट जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात प्रदर्शित होत असून चित्रपटात अजिंक्य देव, शिल्पा तुळसकर, सुनील बर्वे, स्मिता तळवलकर हे कलाकार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रोहित जोशी यांचे आहे. सुधा प्रॉडक्शन प्रस्तुत अनुया म्हैसकर निर्मित ‘आंधळी कोशिंबीर’ हा चित्रपट ३० मे रोजी  प्रदर्शित होणार आहे. याचे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांचे असून चित्रपटात आठ धमाल विनोदी पात्रे आहेत. अशोक सराफ, वंदना गुप्ते, अनिकेत विश्वासराव हे कलाकार चित्रपटात आहेत. आजोबा आणि नातवाच्या माध्यमातून आजच्या पिढीला विस्मृतीत गेलेल्या खेळातील गंमत दाखविण्याचा प्रयत्न दिग्दर्शक गणेश कदम यांनी ‘विटी दांडू’ या चित्रपटात केला आहे. दिलीप प्रभावळकर हे चित्रपटात ‘आजोबा’च्या भूमिकेत असून यतीन कार्येकर, रवींद्र मंकणी आणि अन्य कलाकार यात आहेत. नीना देवरे या चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. तर कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘हुतूतू’मध्ये अशोक सराफ, वर्षां उसगावकर, जीतेंद्र जोशी, हेमंत ढोमे, नेहा पेंडसे, मानसी नाईक आणि स्वत: कांचन अधिकारी हे कलाकार आहेत. या पूर्वीही ‘लपंडाव’, ‘खोखो’ हे मराठी चित्रपट येऊन गेले होते. रंगभूमीवरही मुक्ता बर्वे, विनय आपटे यांचे ‘कबड्डी कबड्डी’ तसेच मुक्ता बर्वे, रिमा लागू यांचे ‘छापा काटा’ ही खेळांची नावे असलेली नाटके आली. खूप वर्षांपूर्वी ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ हा फार्सही रंगभूमीवर सादर झाला होता. ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर सध्या ‘लगोरी’ ही मालिका सुरू आहे.