महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा दहावी व बारावी परीक्षेत पर्यवेक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी असतानाच, यंदापासून मंडळाने कपात केल्याने शिक्षकांत नाराजी निर्माण झाली आहे. महिला शिक्षक भारती संघटनेच्या जिल्हाध्यक्ष आशा मगर यांनी मंडळ, विभागीय सचिव व शिक्षक आमदार कपिल पाटील यांना निवेदन पाठवून याकडे लक्ष वेधले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेत पर्यवेक्षणाचे काम करणाऱ्या शिक्षकांना केल्या वर्षीपर्यंत प्रत्येक विषयासाठी २५ रु. मानधन दिले जात होते. त्यात वाढ करण्याची मागणी होती, परंतु मंडळाने त्यात कपात करत प्रती विषय २० रु. केले आहे ते प्रती विषयासाठी ५० रु. करावे, तसेच उत्तरपत्रिका तपासणीसाठी शिक्षकांना प्रती उत्तरपत्रिका २० रु. मिळतात, हे मानधन अतिशय अल्प असल्याने त्यात वाढ करण्याची मागणी संघटनेने केली आहे.
परीक्षेत कॉपी न करू दिल्यास मुलांकडून महिला शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागतो, अशांवर गुन्हे दाखल करावेत, ५० वर्षे वयापुढील तसेच हृदयरोग किंवा गंभीर आजारी असलेल्या महिला शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम देऊ नये, शाळेतील ५० टक्केच शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासणीचे काम द्यावे जेणेकरून इतर वर्गाच्या अध्यपनात व्यत्यय येणार नाही व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.
निवेदनावर संघटनेच्या पदाधिकारी शोभना गायकवाड, विभावरी रोकडे, लता पठारे, छाया लष्करे, शकुंतला वाळुंज, जया गागरे, जान्हवी नरसाळे, बेबीनंदा लांडे, संध्या गावडे, मंजूषा शेंडगे, अनघा सासवडकर आदींच्या सहय़ा आहेत.