कोल्हार येथील भगवती माता पतसंस्थेच्या लुटीतील ७५ लाखांची रक्कम कुप्रसिद्ध गुन्हेगार चन्या उर्फ सागर बेग व अनिल यशवंते या गुन्हेगारांकडे होती. या रकमेची त्यांनी विल्हेवाट लावली असल्याने आता आरोपी पकडले असले तरी पतसंस्थेला आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
दीड महिन्यांपूर्वी भगवती माता पतसंस्थेवर भरदिवसा दरोडा टाकून ७५ लाखांची लूट करण्यात आली होती. हा दरोडा चन्या बेग याच्या टोळीने टाकला. तरूणाच्या खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला अनिल यशवंते हा कारागृहातून पॅरोलवर सुटून आला असताना त्याने दरोडय़ाचा कट रचला. त्या कटात त्याने बेग टोळीचा वापर केला. दोघेही आता फरार आहेत. यशवंते याच्याकडे दरोडय़ातील निम्मी रक्कम होती, तर बेग याच्याकडे उर्वरित रक्कम होती. पोलिसांना दोघांचाही शोध लागलेला नाही. नाशिक, ठाणे, औरंगाबाद व नगरचे पोलीस त्यांच्या मागावर आहेत. दोघांनीही या रकमेची उधळपट्टी केली असल्याने आता आरोपी पकडले तरी पतसंस्थेला रक्कम परत मिळणार नाही.
दरोडय़ात यापूर्वी चन्या बेगचा भाऊ टिप्या उर्फ सोन्या बेग, सागर मलिक, सागर देशमाने व सराफ अजय कुलथे यांना अटक केली आहे. मंगळवारी विक्रम नारायण परदेशी, नीलेश बाळासाहेब परदेशी, शाहरूख रज्जाक शेख, व शंकर भास्कर नेटके यांना काल अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. दुर्गेश परदेशी हा आरोपी पसार झाला. पकडलेल्या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असली तरी ते चन्या व यशवंते याचा ठावठिकाणा सांगत नाहीत. चौघांनी वाकडी रस्त्यावरही लूटमार केली आहे. तसेच शिर्डी येथे येणाऱ्या साईभक्तांनाही लुटले आहे. शिर्डीत साईभक्तांना लुटणाऱ्या गुन्हेगारांचे एक मोठे रॅकेट कार्यरत आहे. चौघा आरोपींना पकडण्यात आल्याने या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.