प्रभागातील पाणी पळविण्याच्या कारणावरून महापालिका सभागृहनेते महेश कोठे व राष्ट्रवादीचे माजी महापौर मनोहर सपाटे यांच्यातील टोकाला गेलेला संघर्ष पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला असताना अखेर उभयतांमध्ये समझोता होऊन सपाटे यांनी कोठे चुलते-पुतणे व पालिकेचे कनिष्ठ अभियंता देवीदास मादगुंडी यांच्या विरोधात दाखल केलेली खुनाचा प्रयत्न केल्याची फिर्याद मागे घेतली, तर कोठे यांच्या समर्थकानेही सपाटे यांच्याविरोधात तलवारीने खुनीहल्ला केल्याची फिर्याद दाखल केली नाही.
दरम्यान, फौजदार चावडी पोलीस ठाण्यात कोठे-सपाटे यांच्यातील संघर्ष मिटविण्यासाठी कोठे समर्थक नगरसेवक चेतन नरोटे व सपाटे समर्थक राष्ट्रवादीचे नगरसेवक पद्माकर काळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या समक्ष मध्यस्थी केली. त्यातून दोन्ही गटांनी फिर्याद न देण्याचा व दिलेली फिर्याद मागे घेण्यावर समझोता झाल्याचे दिसून आले. खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून सपाटे यांनी, महेश कोठे व त्यांचे पुतणे नगरसेवक देवेंद्र कोठे याच्यासह पालिकेचे कनिष्ठ अभियंता मादगुंडी व इतर ४०-५० जणांच्या जमावाविरुद्ध दिलेली फिर्याद मागे घेतल्याचा जबाब पोलिसांपुढे लिहून दिला. तथापि, फिर्याद मागे घेण्याबाबतचा जबाब लिहून दिला असला तरी त्यानुसार गुन्हा मागे घेता नाही. गुन्हय़ाप्रकरणी न्यायालयात आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर तेथेच अंतिम निर्णय होतो, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
मागील विधानसभा निवडणुकीत सोलापूर शहर उत्तर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे यांनी बंडखोरी केल्यामुळे काँग्रेसचे महेश कोठे यांना पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून कोठे व सपाटे यांच्यातील वैमनस्य वाढले आहे. सपाटे यांना जेरबंद करण्यासाठी कोठे हे पदोपदी प्रयत्न करीत असताना दिसून येतात. सपाटे यांना धडा शिकविण्यासाठी मागील महापालिका निवडणुकीत कोठे यांनी आपले पुतणे देवेंद्र कोठे यांना काँग्रेसतर्फे सपाटे यांच्या बालेकिल्ल्यातून-प्रभाग क्र. १२ मधून निवडून आणले होते. तेव्हापासून दोन्ही गटांत नेहमी कुरबुरी होतात.