इचलकरंजी नगरपालिकेचे इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय शासनाकडे वर्ग करण्याच्या विषयावरून सोमवारी झालेल्या नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्तारूढ व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सत्तारूढ गटाने बहुमताच्या जोरावर रुग्णालय हस्तांतर करू नये, असा ठराव मंजूर केला. तर सत्तारूढ गट प्रत्येक गोष्टीत राजकारण करीत आहे, असा आरोप करीत विरोधी शहर विकास आघाडीचे प्रतोद अजित जाधव यांनी निषेध नोंदविला. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.    
नूतन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात ५१ विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी सोमवारी सभेचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सुप्रिया गोंदकर होत्या. सभेच्या सुरुवातीला अनधिकृत बांधकामांचा विषय शशांक बावचकर यांनी उपस्थित केला. तर विरोधी पक्षांनी शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीची लक्षवेधी उपस्थिती होती. सभाध्यक्षकांनी ती फेटाळून लावली.    
शहर मंजूर विकास योजनेत फेरफार करणे आणि पालिकेचे गेस्ट हाउस डीकेटीई शिक्षण संस्थेला भाडय़ाने देण्याच्या विषयावर चांगलीच चर्चा झाली. हे दोन्ही विषय सत्तारूढ गटाने बहुमताने मंजूर केले.
 पालिकेचे आयजीएम इस्पितळ शासनाकडे हस्तांतरित करण्याच्या विषयावर सत्तारूढ व विरोधी गटात जुगलबंदी रंगली. सत्तारूढ गटाने इस्पितळ पालिकेने चालविणे कसे योग्य ठरणार आहे. तसेच ते कसे सक्षम होणार आहे, याची मांडणी केली. तर विरोधकांनी इस्पितळ शासनाकडे हस्तांतरित केल्यामुळे कोणते फायदे मिळणार आहेत याचे विवेचन केले. शशांक बावचकर, रवी रजपुते, भाऊसाहेब आवळे, संजय केंगार या सत्तारूढ गटाच्या सदस्यांनी तर अजित जाधव, जयवंत लायकर, प्रमोद पाटील, तानाजी पोवार, महादेव गौड, संतोष शेळके, सयाजी चव्हाण या विरोधी सदस्यांनी भूमिका मांडली. सुमारे अर्धा तास आरोप-प्रत्यारोप आणि घोषणाबाजी सुरू राहिली. सत्तारूढ गटाने बहुमताने ठराव मंजूर केला.    
शहराच्या वाहतुकीबाबत गांभीर्याने चर्चा होण्याची मागणी छाया पाटील यांनी केली. आजच्या सभेत उपनगराध्यक्ष संजय कांबळे, अशोक जांभळे, बाळासाहेब कलागते, पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी सहभाग घेतला.