महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेचे भारतीय जनता पक्षात तीव्र पडसाद उमटले आहेत. कोणी काहीही म्हटले तरी जागावाटपाची चर्चा पक्षाने नेमलेल्या समितीशीच करावी लागेल, अन्यथा जागावाटपाबाबतची बोलणी भाजपसुध्दा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी करील असे सुतोवाच पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्याने केले.
मनपाच्या निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या असून राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सध्या सुरू आहे. या प्राथमिक टप्प्यातच मनपातील सत्ताधारी भाजप-शिवसेना युतीत सध्या तणावाचे वातावरण आहे. भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अभय आगरकर यांनी मनपाच्या शहरातील निम्म्या जागावर दावा केला. त्याला उत्तर देताना आमदार अनिल राठोड यांनी भाजपच्या शहरातील पदाधिकाऱ्यांचे अस्तित्वच एका अर्थाने नाकारले. जागावाटपाबाबत शिवसेना भाजपच्या जिल्हा शाखेशी बोलणी करील असा गर्भित इशारा त्यांनी दिला. त्याचेच भाजपमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत.
आगरकर यांनी या गोष्टीला फारसे महत्व दिलेले दिसत नाही. याबाबत आपल्याला काही बोलायचे नाही असे ते म्हणाले. मात्र अन्य नेत्यांनी सडेतोड प्रतिक्रिया व्यक्त केली. मुळातच जागावाटपाटी बोलणी व्यक्तीकेंद्रीत असूच शकत नाही. शिवाय भाजपच्या वतीने ही बोलणी कोणी करावी हे ठरवण्याचा अधिकार मित्रपक्षाला नाही. हा भाजपचाच निर्णय आहे. त्यादृष्टीनेच पक्षाच्या प्रदेश शाखेने पाच जणांची समितीही नियुक्त केली आहे. मनपा निवडणुकीतील पक्षाची भूमिका ही समितीच ठरवणार आहे. पक्षानेच याबाबतचे सर्वाधिकार या समितीलाच दिले असून त्यातही शहराचीच भूमिका महत्वपुर्ण ठरणार आहे. त्यामुळेच ‘जागावाटपाची बोलणी भाजपच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांशी करू’ या म्हणण्याला काही अर्थच नाही, किंबहुना हा बालिशपणाच आहे असा सूर पक्षाच्या गोटात व्यक्त झाला.
शिवाय शिवसेना या भूमिकेवर ताठर राहिली तर जागावाटपाबाबत त्यांच्या वतीने कोणी बोलणी करावी, यात भाजपही हस्तक्षेप करू शकतो. अगदीच वेळ आली तर भाजपही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी चर्चा करील, मात्र अशी वेळ येऊ नये, युतीत अशा पध्दतीने बेबनाव होऊ नये अशीच भाजपची भूमिका आहे असे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.