कोल्हापूर जिल्ह्य़ातील लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून सध्या गोंधळात गोंधळ सुरू आहे. कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात संभाव्य उमेदवार कोण असणार यावरून उलटसुलट विधाने होऊ लागल्याने राजकीय वातावरण तापत चालले आहे. कोल्हापुरात खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी निवडणूक लढविण्याचे संकेत दिले असताना धनंजय महाडिक यांनी आपली उमेदवारी जाहीर करून पुढचे पाऊल टाकले आहे. शिवाय कामगारमंत्री हसन मुश्रीफ, युवराज संभाजीराजे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनीही हे सुद्धा आखाडय़ात उतरण्याच्या तयारीत आहेत. हातकणंगले मतदारसंघात खासदार राजू शेट्टी यांचे नाव निश्चित असताना त्यांच्याविरुद्ध ग्रामविकासमंत्री जयंत पाटील, आमदार विनय कोरे, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने अशा मातबरांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. अर्थात जी नावे उमेदवार म्हणून पुढे येत आहेत, त्यापैकी काहींना थेट लढायचे आहे. तर काही जण दुसऱ्याचे नाव पुढे करीत कातडी बचाओ धोरण अवलंबताना दिसत आहेत. मुळात काँग्रेस व राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार की स्वतंत्र हे अधांतरीच असताना उमेदवारीच्या नावाचा घोळ मात्र रंगत चालला आहे.
पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार हे निश्चित आहे. त्याची तयारी जिल्ह्य़ातील सर्वच पक्षांकडून सुरू झाली आहे. कधी नेते मंडळी थेट कोल्हापुरात येऊन अंदाज घेत आहेत. तर काही जण निरिक्षकांना पाठवून परिस्थितीचा कानोसा घेत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या निवडणुकीत दोन्ही जागा गमवाव्या लागल्या होत्या. त्याची भरपाई करण्याच्या दृष्टीने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सावध हालचाली सुरू आहेत. गतवेळी गमावलेली पदे यंदा भरून काढण्याच्या निर्धाराने काका-पुतणे व्यूहरचना करताना दिसत आहेत. त्यासाठी दोन्ही जागांवर तगडे उमेदवार उभे करण्याबरोबरच त्यांना समर्थन करणारे बेरजेच्या राजकारणाची गोळाबेरीजही त्यांनी चालविली आहे. मात्र उमेदवार कोण? याबाबत मात्र संदिग्धता कायम आहे.
अलीकडेच कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांना लोकसभा निवडणुकीचे उमेदवार करण्याचे सूतोवाच मुंबईतील एका कार्यक्रमात झाले होते. या सरशी मुश्रीफ यांनी दिल्लीऐवजी मुंबईच बरी असा सावध पवित्रा घेत दुसरा सक्षम उमेदवार शोधण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांनी भीमा साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांची उमेदवारी निश्चित असेल, असे भाष्य केले. पण त्यावरून गतवेळी राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरलेले युवराज संभाजीराजे यांच्यासह इतरांनी आक्षेप घेतल्यानंतर मुश्रीफांना पवित्रा बदलावा लागला. त्यांनी महाडिक यांची उमेदवारी जाहीर करायला मी पक्षाचा मालक नाही, अशी सारवासारव करीत याचा निर्णय पवारांकडे असल्याचे स्पष्ट केले.
दुसरीकडे धनंजय महाडिक यांनी लोकसभेची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायचीच, अशी गर्जना वाढदिवसादिवशी केली. विशेष म्हणजे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मनसे अशा सर्वच पक्षांकडून संभाव्य उमेदवार म्हणून धनंजय महाडिक यांचे नाव घेतले जात आहे. त्यामुळे महाडिक सध्या भलत्याच फार्मात आले आहेत. मात्र त्यांनी दूरदृष्टी ठेवून सावध भूमिका न घेतल्यास उतावीळपणा नडण्याची शक्यताही तितकीच आहे. दुसरीकडे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचे भाष्य केले आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या निवडणूक लढविण्याच्या तयारीवर पाणी फिरविण्याचा प्रयत्न केला. त्यातून शिवसेनेतील गटबाजी उफाळून आली. संपर्कप्रमुख दिवाकर रावते व अरुण दुधवाडकर या दोघांच्या हकालपट्टीची मागणी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्याकडून झाली. पवार-देवणे यांच्यात सख्य आहे. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी टोकाला पोहोचली असून त्यातून लोकसभा व विधानसभा निवडणुकीवेळी परस्परांना पराभूत करण्याच्या हालचाली होणार हेही स्पष्ट आहे.
हातकणंगले मतदारसंघातील खासदार राजू शेट्टी यांना पराभूत करणे हे पवार काका-पुतण्यांचे मुख्यध्येय आहे. त्यासाठी शेट्टी विरुद्ध तोलामोलाची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातूनच ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे नाव पक्षाच्या एका बैठकीतून पुढे आले आहे. त्याचबरोबर वारणाउद्योग समूहाचे आमदार विनय कोरे यांनाही उमेदवारी देता येते का, याचा अंदाज घेतला जात आहे. राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचे अध्यक्षपद कल्लाप्पाण्णा आवाडे यांना देऊन पवारांनी बेरजेचे राजकारण साधले आहे. शेट्टी यांच्या मागे राहणारा जैन समाज आवाडे यांच्या सहकार्यामुळे राष्ट्रवादीच्या उमेदवारासोबत राहील, असे राजकीय समीकरण पवारांनी बांधले असल्याचे जाणवत आहे.
अलीकडेच कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी एका मुलाखतीच्या दरम्यान योग्यवेळी योग्य तो निर्णय घेऊ असे विधान केल्याने त्याचा राजकीय अन्वयार्थ लावण्यात जिल्ह्य़ातील राजकारणी व्यग्र आहेत. तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाच्या दिल्लीहून आलेल्या निरीक्षकांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचा आढावा जिल्ह्य़ातील नेत्यांकडून घेतला आहे. काँग्रेस पक्ष सुद्धा या निवडणुकीत भक्कमपणे उतरेल, असे जिल्ह्य़ातील पक्षाचे नेते सांगत आहेत. त्यातून काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये राजकीय विसंवाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार के.पी.पाटील यांनी गतवेळी दोन्ही जागा राष्ट्रवादीकडे असल्याने काँग्रेस पक्षाने उमेदवारी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे सांगत काँग्रेसचा मुख बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. अशा उलटसुलट विधानांमुळे आणि परिस्थिती सतत दोलायमान होत चालल्याने लोकसभा निवडणुकीचा हा गोंधळ पुढेही सुरूच राहणार हे स्पष्टपणे जाणवत आहे.