जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत बहुचर्चित ठरलेल्या ताज्या शिपाईभरतीच्या विषयावर कुणी अवाक्षरही काढले नाही, मात्र आधी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा विषय लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते. संचालक मंडळाच्या पुढच्या बैठकीत तो ठेवण्याची सुचना बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर यांनीच केली. या दोन्ही सभांकडे २४ पैकी तब्बल १३ संचालकांनी पाठ फिरवली.  
बँकेची ५५ वी वार्षिक सभा बँकेचे अध्यक्ष खेमनर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपस्थित सभासद किंवा संचालक यापैकी कुणीही सभेत भरतीच्या विषयाला स्पर्शदेखील केला नाही. उपाध्यक्ष उदय शेळके व ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासह आमदार शिवाजी कर्डिले, सिताराम गायकर, बापुसाहेब देशमुख, रामदास वाघ, रावसाहेब म्हस्के, प्रकाश फिरोदिया, पांडुरंग अभंग व संपतराव म्हस्के असे अकराच संचालक या सभेला उपस्थित होते. सुरूवातीला दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख, ज्येष्ठ नेते शंकरराव काळे, बँकेचे माजी उपाध्यक्ष गोपाळराव सोले यांच्यासह वर्षभरातील दिवंगतांना आदरांजली वाहण्यात आली.
गडाख यांनी सभेत बोलताना भविष्याच्या दृष्टीने चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, जिल्हा बँकेला उज्वल परंपरा आहे. उत्तम नेतृत्व बँकेला लाभले, म्हणुनच जिल्हा बँक आजही अत्यंत सक्षमपणे उभी आहे. बँकेने जिल्ह्य़ाचे अर्थकारण व त्या माध्यमातून समाजकारणाला बळकटी दिली. यापुढचा काळ मात्र कठीण आहे. जिल्ह्य़ात सलग दोन वर्ष दुष्काळी स्थिती आहे. पुढच्याही वर्षी पावसाबद्दल चिंता व्यक्त होत आहे. अशा स्थितीत जिल्ह्य़ातील साखर कारखाने बंद राहण्याचीच शक्यता अधिक असुन या निसर्गचक्राशी सामना करतानाच बदलत्या सहकार कायद्याच्या पाश्र्वभुमीवर जिल्हा बँकेला पुढच्या काळात नियमांचे काटेकोर पालन करत या साऱ्या आव्हानांचा समना करावा लागेल.
खेमनर यांनी सुरूवातीला बँकेच्या वार्षिक कारभाराचा आढावा घेतला. यंदा ९ टक्के लाभांशाची घोषणा करतानाच संपलेल्या आर्थिक वर्षांत बँकेला १९ कोटी रूपयांचा नफा झाला असुन बँक स्वबळावरच स्वयंपुर्ण आहे. नाबार्डनेही बँकेला ए दर्जा दिल्याचे त्यांनी सांगितले.
सुरूवातीला प्रभारी कार्यकारी संचालक प्रकाश खिस्ती यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. शंभर टक्के वसुली केलेल्या संस्थांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्वश्री. प्रा. भाऊसाहेब कचरे, कोंडाजी जाधव, खंडूभाऊ डुक्रे, भास्कर वर्पे, रामनाथ सहाणे, रविंद्र कवडे, अंबादास बेरड आदींनी विविध विषय मांडले. शेवटी उपाध्यक्ष उदय शेळके यांनी आभार मानले.