औद्योगिक श्रेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शासनाच्या जिल्हा उद्योग केंद्राकडून देण्यात येणारा जिल्हास्तरीय उद्योग पुरस्कार अमरावतीच्या ‘तृप्ती’ उद्योगाच्या चंदा विलासराव वानखडे यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी विभागीय आयुक्त आर. डी. बनसोड, पोलीस आयुक्त अजित पाटील, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, माजी मंत्री वसुधा देशमुख, आमदार रावसाहेब शेखावत, आमदार यशोमती ठाकूर, आमदार रवी राणा, आमदार प्रवीण पोटे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे, जिल्हा उद्योग केंद्राचे सहसंचालक गिरीश उमप, व्यवस्थापक निरंजन गाठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कारप्राप्त उद्योजिकेने गृहिणींच्या श्रमप्रतिष्ठेसाठी २१ वर्षांंपूर्वी प्राध्यापकाची नोकरी सोडून सौंदर्य-गृह-उद्योग नावाने लघुउद्योगाची स्थापना करून ‘तृप्ती’ नावाने अनेक खाद्यपदार्थांची निर्मिती केली. लोकरुचीसह आरोग्यवत नैसर्गिकतत्वे जोपासणाऱ्या या उत्पादनांना राज्याबाहेरून सुद्धा मोठी मागणी होते आहे. वृद्ध, परित्यागिता, निराधार महिलांना रोजगारासह अर्थ व श्रमप्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली आहे.
नांदगावपेठ येथील पंचतारांकित औद्योगिक नगरीत नव्याने उभारण्यात येत असलेल्या त्यांच्या सौंदर्य फुड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत नव्या उद्योग धोरणानुसार गुंतवणूक आणि रोजगाराची व्याप्ती वाढवून उत्पादनांची बाजारातील मागणी पूर्ण करण्याचा त्यांचा मानस असल्याचे सांगून २०११ वर्षांसाठीच्या दोन पुरस्कारासाठी जिल्ह्य़ातील २३०० उद्योगांमधून पात्र ठरलेल्या १० उद्योजकांमधून या महिला उद्योजिकेची निवड करण्यात आल्याचे उद्योग निरीक्षक चंद्रशेखर कावरे यांनी सांगितले.