जिल्हा कबड्डी संघटनेच्या गौरव सोहळ्यात प्रकाश बोराडे यांचे प्रतिपादन
प्रो-कबड्डी लीगमुळे कबड्डीला सुगीचे दिवस आले असून खेळाडूंनी व जिल्ह्य़ातील क्रीडा संस्थांनी कठोर मेहनत घेतल्यास त्यांनाही संधी आहे, असे मत महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सहकार्यवाह प्रकाश बोराडे यांनी व्यक्त केले. नाशिक जिल्हा संघटना व शिंदे येथील राजाभाऊ तुंगार व्यायामशाळा यांच्या वतीने दुसऱ्या कबड्डी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी मनमाडच्या आझाद नवजवान क्रीडा मंडळाचे ८८ वर्षीय कार्यकर्ते निवृत्ती तुकाराम शिंपी यांचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाप्रसंगी मंचावर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा आयोजक संजय तुंगार, महाराष्ट्र राज्य नेटबॉल संघटनेचे सचिव संजय पाटील, शिंदेच्या सरपंच उज्ज्वला जाधव, जिल्हा संघटनेचे प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड, बाळासाहेब जाधव आदी उपस्थित होते. बोराडे यांनी प्रो-कबड्डी लीगमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळणार असून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टवर होणार असल्याने देशातील सर्व खेळाडूंना चांगल्या खेळाडूंचा खेळ घरबसल्या पाहण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे नमूद केले. कबड्डीमुळे अर्जुन पुरस्कार विजेता नगरचा खेळाडू पंकज शिरसाठ यास पोलीस अधीक्षकाचंी नोकरी मिळाली. तर, सुवर्णा बारटक्के, दीपिका जोसेफ, अभिलाषा म्हात्रे यांना कोटय़वधींचे इनाम तसेच प्रथमवर्ग अधिकारी संवर्गातील नोकरी मिळाली. जिल्ह्य़ातील सर्व संस्था व खेळाडूंनी चांगली मेहनत केल्यास त्यांनाही अशी संधी मिळू शकते, असे बोराडे यांनी निदर्श्रनास आणून दिले. यावेळी उत्कृष्ट खेळाडू म्हणून प्रणव अहिरे (क्रीडा प्रबोधिनी), सारिका जगताप (रचना क्लब), उत्कृष्ट मार्गदर्शक प्रशांत भाबड (क्रीडा प्रबोधिनी), पूनम मोहिते (रचना क्लब), ज्येष्ठ कार्यरत संस्था गुलालवाडी व्यायामशाळा, उत्कृष्ट कार्यरत संस्था अशोक क्रीडा मंडळ (मनमाड), स्पर्धा आयोजक राजाभाऊ तुंगार व्यायामशाळा (शिंदे) आदींना गौरविण्यात आले. प्रास्तविक प्रमुख कार्यवाह मोहन गायकवाड यांनी केले. आभार संजय तुंगार यांनी मानले. यावेळी शरद पाटील, विलास पाटील, दत्ता जाधव, रहेमान शेख, कीर्ती पाटील, कविता मोहिते आदी उपस्थित होते.