शहरातील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे तातडीने सुरू करण्याचे पत्र महानगरपालिकेने दिल्यानंतरही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे बघून जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी अधीक्षक अभियंता प्रकाश लुंगे यांची सर्वांसमक्ष चांगलीच खरडपट्टी काढली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांसमक्ष प्रमुख रस्त्यांची पाहणी करून येत्या तीन दिवसात कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले.
 शहरातील भूमिगत गटार योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्यांच्या कामाला लगेच सुरुवात करा, असे निर्देश पालकमंत्री संजय देवतळे यांनी महिनाभरापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत दिले होते. त्या आदेशाच्या अधिन राहून महानगरपालिकेचे आयुक्त प्रकाश बोखड यांनी शहरातील प्रमुख भागातील भूमिगत गटार योजनेची कामे पूर्ण केली. ही कामे पूर्ण झाल्याचे पत्र महानगरपालिका देत नाही तोवर डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करणार नाही, अशी भूमिका बांधकाम विभागाने घेतली. त्यामुळे गेल्या आठवडय़ात त्यांनी पठाणपुरा ते गांधी चौक व कस्तुरबा चौक ते अंचलेश्वर गेट या दोन रस्त्यांची कामे पूर्ण झाल्याचे पत्र आयुक्त बोखड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. आयुक्तांचे पत्र मिळताच बांधकाम खात्याने डांबरीकरणाच्या कामाला तातडीने सुरुवात करायला हवी होती, मात्र बांधकाम खात्याचे अधिकारी काम सुरू करण्यास टाळाटाळ करत आहेत. त्याचा परिणाम शहरातील लोकांना रस्त्यांवरील खड्डे व धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार बांधकाम खात्याने काल सोमवारपासून काम सुरू करणार असल्याचे सांगितले होते, परंतु बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या दौऱ्यात काल सर्व अधिकारी व्यस्त असल्याने काम सुरू होऊ शकले नाही. त्यामुळे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी बांधकाम विभागात विचारणा केली असता काम सुरू होण्यास आणखी वेळ लागेल, असे उत्तर दिले. याच वेळी जिल्हाधिकारी विजय वाघमारे यांनी महानगरपालिकेचे आयुक्त प्रकाश बोखड, अधीक्षक अभियंता प्रकाश लुंगे, वीज मंडळ व इतर खात्याच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन शहरातील प्रमुख रस्त्यांची पाहणी केली.रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे शहरातील लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यात धुळ व प्रदूषणाचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी अधिकाऱ्यांनी तत्परतेने काम करणे गरजेचे असतांना बांधकाम खात्याकडूनच का उशिर होत आहे, अशी विचारणा केली. यावर लुंगे यांच्याकडे काहीही उत्तर नव्हते. यावर संतापलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी कामात अशी दिरंगाई खपवून घेणार नाही, असे ठणकावून येत्या तीन दिवसात डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले.
वीज मंडळाचे अधिकारीही भूमिगत विद्युत लाईनचे काम अतिशय संथ गतीने करत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांचीही चांगलीच खरडपट्टी काढली. जिल्हाधिकाऱ्यांनी जवळपास दोन तास शहरातील रस्त्यांची आज पाहणी केली. रस्त्यांची ही सर्व कामे पंचशताब्दीच्या निधीतून केली जात असल्याने कामाचा दर्जा उत्तम ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या दोन रस्त्यांसोबतच चार प्रमुख रस्त्यांच्या कामालाही लवकरच सुरुवात करा, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले.