अतिवृष्टीत वैनगंगा, बावनथडी व बाघ नदीवरील धरणाचे पाणी सोडण्यात येत असल्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्य़ात, तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्य़ात पूरपरिस्थिती निर्माण होते. यावर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने शिवनीचे जिल्हाधिकारी बी.चंद्रशेखर यांच्या अध्यक्षतेखाली बालाघाट, गोंदिया व भंडारा जिल्ह्य़ातील प्रमुख अधिकाऱ्यांची बठक नुकतीच बालाघाट येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.
या बठकीला गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ.अमित सनी, भंडाराचे जिल्हाधिकारी सचिन्द्र सिंह,  बालाघाट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी अविनाश लवानिया उपस्थित होते. शिवनी जिल्ह्य़ातील वैनगंगा नदीवरील भीमगड, बालाघाट जिल्ह्य़ातील बावनथडी नदीवरील राजीव सागर आणि गोंदिया जिल्ह्य़ातील बाघ नदीवरील सिरपूर, पुजारीटोला व कालीसरार या धरणाचे पाणी एकाच वेळी न सोडता, तसेच वैनगंगा नदीची पूरस्थिती टाळण्यासाठी सिरपूर, पूजारीटोला व कालीसरार धरणाचे पाणी नियोजन करून नियमीतपणे सोडले जाईल, या विषयावर चर्चा करण्यात आली. धरण पूर्ण भरल्यावर अतिवृष्टीत पूरपरिस्थितीवर नियंत्रण करता यावे, यासाठी धरणाचे दरवाजे उघडण्याबाबतची सूचना त्वरीत संबंधित जिल्ह्य़ाच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. भीमगड व राजीव सागर धरणाचे पाणी सोडण्याचा निर्णय गोंदिया व भंडारा जिल्हा प्रशासनाला सूचना करण्यासाठी बालाघाटचे मुदगल यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बालाघाट, शिवनी, गोंदिया व भंडारा जिल्ह्य़ातील सिंचन विभागाचे अधिकारी आपसात समन्वय ठेवून योग्य निर्णय घेऊन पूरपरिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे बठकीत निश्चित करण्यात आले.
बठकीला बालाघाटचे अपर जिल्हाधिकारी एस.एस. मीना, शिवनीचे संयुक्त जिल्हाधिकारी सी.एस.शुक्ला, पी.के.मुदगल, कार्यपालन अधिकारी सुभाष पटेल, एस.एस.गहरवार, बाघ इटियाडोह प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता वसंत गोन्नाडे, गोसीखुर्द प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता पी.एल.खंडाते, भंडाऱ्याचे सहायक कार्यकारी अभियंता एस.एफ.विश्वकर्मा, शिवनीचे एस.आर. भलावी, गोंदिया येथील संबंधित अधिकारी उपस्थित होते.