खारपाणपट्टय़ातील ग्रामीण जनतेला शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या बुलढाणा जिल्हा परिषदेने महाराष्ट्र शासनाच्या खारपाणपट्टय़ातील १४० गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत अकारण प्रशासकीय व तांत्रिक अडसर निर्माण केल्याने या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेस विलंब होत असल्याची माहिती जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी दिली.
जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या चुकीच्या धोरणाचा फटका खारपाणपट्टय़ातील लाखो जनतेला बसणार असल्याने त्याविरोधात मंत्रालयात उपोषण करण्याचा इशारा डॉ.कुटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केला आहे.
जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातील प्रामुख्याने जळगाव जामोद, संग्रामपूर व शेगाव तालुक्यातील खारपाणपट्टय़ात लाखो जनतेला पिण्याचे शुध्द पाणी मिळत नाही. त्यामुळे या परिसरात किडनी रोगाने थमान घातले असून आतापर्यंत या रोगाचे तीनशे बळी गेले आहेत.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी राहिलेले एक नेते सुध्दा यात रोगाचे बळी ठरले. ही विदारक परिस्थिती लक्षात घेता जळगाव जामोदचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी मतदार संघातील १४० गावांसाठी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना खेचून आणली.
ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यान्वित करणार आहे. विशेष बाब म्हणून या योजनेची दहा टक्क्याची लोकवर्गणीची बाब शिथिल करण्यात आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामाच्या पूर्णत्वानंतर या योजनेचे जिल्हा परिषद सनियंत्रण करेल, असा ठराव जिल्हा परिषदेने शासनास पाठविणे अनिवार्य आहे, मात्र जिल्हा परिषदेने एका कॉंग्रेस नेत्याच्या इशाऱ्यावर असा ठराव पाठविण्यास अक्षम्य विलंब चालविला आहे. लोकहिताच्या कामात असा अडसर आणणे योग्य नाही.
जिल्हा परिषद असा ठराव देत नसेल तर शासनाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या विशेषाधिकारात या योजनेला मंजुरी मिळवून घ्यावी  आणि योजनेच्या कामास सुरुवात करावी. असा ठराव न देण्याच्या संदर्भात आयुक्तांनी जिल्हा परिषदेची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी देखील कुटे यांनी केली आहे.
संजय कुटे म्हणाले की, या आर्थिक वर्षांत उपलब्ध तरतूद खर्च होऊन प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती मिळणे आवश्यक आहे. आर्थिक वर्ष संपण्याच्या बेतात असल्याने योजनेचा निधी अखर्चित राहण्याची शक्यता आहे. ही योजना निर्धारित कालावधीत पूर्ण न झाल्यास किंवा
निधी परत गेल्यास यास जिल्हा परिषद जबाबदार राहील, असा आरोप डॉ. कुटे यांनी केला.
खारपाणपट्टय़ातील या जीवनमरणाच्या प्रश्नावर मंत्रालयात किंवा मुख्यमंत्र्याच्या दालनासमोर उपोषण
करण्याचा इशारा आमदार डॉ.संजय कुटे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रातून केला आहे.