सीना नदीचे प्रदुषण
महापालिका शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करता सीना नदीत सोडुन नदीतील पाणी दुषित करत आहे, या दुषित पाण्यामुळे नगर तालुक्यातील गावांचा पिण्याच्या पाणी पुरवठा बाधित झाल्याने महापालिकेविरुद्ध कायदेशीर कारवाईसाठी दाद मागण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला.
जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलाराव लंघे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. सभेत महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार मिळाल्याबद्दल लंघे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेस उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती बाबासाहेब तांबे, कैलास वाकचौरे, शाहुराव घुटे तसेच सदस्य सुजित झावरे, बाळासाहेब हराळ, आण्णासाहेब शेलार, सुवर्णा निकम, सीईओ रवींद्र पाटील तसेच विभागप्रमुख उपस्थित होते. महापालिकेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय यापुर्वीच्याच सर्वसाधारण सभेत व स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला होता, त्यावर काय कार्यवाही झाली, अशी विचारणा हराळ यांनी केली. सीना नदीत महापालिेकने दुषित पाणी सोडल्याने नगर तालुक्यातील १७ गावांचा पुरवठा दुषित झाला आहे, तेथील शेती उध्वस्त होऊन नागरीकांचे जीवन धोक्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधणार
एमआरईजीएसच्या जिल्हा परिषदेकडील कामांची संख्या व तेथील मजुरांची संख्या अधिक आहे, त्यातुलनेत इतर सरकारी यंत्रणांकडील कामे व मजुर संख्या कमी आहे, सध्याची टंचाई परिस्थिती लक्षात घेता आगामी काळात कामांची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढणार आहे. त्यामुळे इतर सरकारी यंत्रणांनीही त्यांच्याकडील कामांची संख्या व मजुर संख्या वाढवावी ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन देण्याचा निर्णय पदाधिकाऱ्यांनी घेतला.