यवतमाळ जिल्हा परिषदेची सर्व साधारण सभा विरोधी पक्ष गाजवत असल्याचा इतिहास असला तरी बुधवारी झालेली जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मात्र सत्तारूढ पक्षाच्या सभासदांनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून गाजवली.
जिल्हा परिषदेचे अधिकारी लोकांच्या समस्या ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात आणि त्यांच्या लहरी कारभारामुळे जि.प. सदस्यांना जनसामान्यांच्या समस्यांची सोडवणूक करणे कठीण जाते, अशी टीका सत्तारूढ सदस्यांनीच केली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व साधारण सभेत मंदा गाडेकर, आशिष कुलसंगे, मिलिंद धुर्वे, गावंडे, देवानंद पवार, संदीप िहगमिरे, बाळासाहेब चंद्रे, दिवाकर राठोड, भीमराव राठोड, मालता िझगरे, शरद चिकाटे, शालिनी सोमनकर, आरती फुपाटे, प्रताप राठोड, माधवी पाटील इत्यादी सत्तारूढ राष्ट्रवादी, शिवसेना तसेच विरोधी पक्ष असलेल्या कांॅग्रेसच्या सदस्यांनी सभा गाजवली. मानव विकास मिशनच्या एस.टी. बसेसचा मुद्दा, आदिवासी प्रकल्प अधिकाऱ्यांची उपस्थिती, जिल्ह्य़ात सुरू असलेल्या अनधिकृत शाळा, जिल्हा परिषद जागेवरील अतिक्रमण, महिला पदाधिकाऱ्यांशी काही अधिकाऱ्यांचे उध्दटपणे वागणे इत्यादी प्रश्नावरून सभासदांनी सभा चांगलीच गाजवली. यावेळी जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांचे सभापती, सीईओ नवलकिशोर राम, तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी हजर होते. जिल्हा परिषदेची आमसभा सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम काँग्रेसचे दिवंगत आमदार नीलेश पारवेकर, तसेच जि.प.चे दिवंगत सदस्य आनंदराव मोहोड यांना मौन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
‘लॅपटॉप‘ पाहिजेत फुकटात  
जिल्हा परिषद सदस्यांना ‘अपडेट‘ राहता यावे, यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व म्हणजे ६२ सभासदांना लॅपटॉप देण्यात यावे, अशी मागणी काही सभासदांनी केली. ही मागणी रास्त असल्याचे मत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी व्यक्त करून सभासदांना लॅपटॉप देण्यासाठी जिल्हा परिषद निधीतून आíथक तरतूद करण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.
अध्यक्षांचा माजी सभापतींना टोला बांधकाम विभागातील १३ व्या वित्त आयोगाच्या निधी संदर्भात सभागृहात चर्चा सुरू असतांना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख खुलासा करू लागले तेव्हा विषयांतर करू नका, मुद्याचेच तेवढे बोला, असे विरोधी पक्षातील कॉंग्रेस सदस्य देवानंद पवार यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांना सुनावले तेव्हा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी देवानंद पवार यांची फिरकी घेतली. विषयांतर करण्याची कला आम्ही तुमच्यापासूनच शिकलो, असा टोला प्रवीण देशमुख यांनी देवानंद पवार यांना लगावला. देवानंद पवार हे गेल्या खेपेला जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती होते तेव्हा प्रवीण देशमुख विरोधी पक्षात होते. सभापती असतांना देवानंद पवार विषयांतर करीत असल्याचा प्रवीण देशमुखांचा दावा होता.