माजी खासदार बाळासाहेब विखे हे दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी येत्या शनिवारी (दि. १२) तालुक्यात येत आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार जयंत ससाणे यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेनंतर विखे प्रथमच तालुक्यात येत असल्याने दौऱ्याबद्दल कुतूहल आहे.
तालुक्यात पढेगाव, टाकळीभान, बेलापूर आदी गावांना ते भेटी देणार असून अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. विखे यांचा दौरा हा राजकारणविरहीत आहे. दुष्काळ निर्मूलनासाठी त्यांनी सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन केले आहे. सर्वच पक्षांत त्यांना माणणारा वर्ग आहे. तालुक्यात चार महिन्यांनंतर भंडारदरा धरणाच्या पाण्याचे आवर्तन मिळाले. आता धरणातून केवळ शेतीसाठी एकच आवर्तन मिळण्याची शक्यता आहे. उसाच्या पिकाचे उत्पादन घटणार आहे. टाकळीभान टेल टँकमध्ये पाणी न सोडल्याने आता गावाला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तसेच हरभरा व गव्हालाही पाण्याची टंचाई जाणवणार आहे.  दुष्काळी परिस्थिती असली तरी बहुसंख्य गावांची पिकांची नजर आणेवारी ५० पैशांपेक्षा जास्त लागली आहे. त्यामुळे दुष्काळ निर्मूलनासाठी सरकारने जाहीर केलेल्या सोयी सवलतींचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकणार नाही. आणेवारी जादा लागल्याने शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत भाग घेतलेला नाही. तालुक्यात नरेगाचेही काम बंद आहे. त्यामुळे प्रथमच शेतकऱ्यांच्या व शेतमजुरांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले जाणार आहे.
विखे व ससाणे यांच्यात राजकीय मतभेद निर्माण झाले आहेत. खंडकरी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवून ससाणे यांना लक्ष केले होते. विखे यांचे समर्थक गेल्या अनेक वर्षांंपासून ससाणे यांना मदत करत होते. पण आता त्यांनी आपली भूमिका बदलली आहे. ससाणे हे विखे यांच्या दौऱ्यात सहभागी होणार नाहीत. तसेच त्यांचे समर्थकही दौऱ्यापासून दूर राहण्याची शक्यता आहे. विखे-ससाणे यांच्या वादात आमदार भाऊसाहेब कांबळे यांची मात्र गोची होत आहे. त्यामुळे तालुक्यात विखे यांच्या दौऱ्याबद्दल मोठे कुतूहल आहे.