जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने दिले जाणारे ‘आदर्श गोपालक’ व ‘आदर्श शेतकरी’ तसेच महिला बालकल्याण विभागाच्या वतीने दिले जाणारे ‘आदर्श अंगणवाडी कर्मचारी’ असे पुरस्कार यंदा स्वतंत्र कार्यक्रम न होता, जिल्ह्य़ातील महिला बचतगटांच्या ‘साईज्योती स्वयंसहायता यात्रा’ या प्रदर्शनातच वितरीत केले जाणार आहेत. दोन्ही विभागांकडे या कार्यक्रमांसाठी स्वतंत्र तरतूद असतानाही प्रदर्शनाच्या कार्यक्रमात हे तिन्ही पुरस्कार वितरण ऐनवेळी समाविष्ट केले गेले आहेत.
या पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने जिल्ह्य़ातील तिन्ही मंत्री मात्र प्रथमच जिल्हा परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र येत आहेत. कृषी विभागाच्या पुरस्कार वितरणासाठी पालकमंत्री बबनराव पाचपुते, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे उपस्थित राहणार आहेत, त्यांची नावेही पत्रिकेत टाकण्यात आली आहेत. महिला बचतगटांच्या उत्पादनाचे विक्री व प्रदर्शन यंदा ४ ते ८ जानेवारी दरम्यान सावेडीतील जॉगिंग पार्कच्या मैदानावर होत आहे. याच प्रदर्शनात कृषि विभागाचे आदर्श गोपालक व आदर्श शेतकरी पुरस्कार वितरण दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. सभापती बाबासाहेब तांबे यांनी ही माहिती दिली. हे दोन्ही पुरस्कार प्रत्येकी ८९ प्रमाणे एकूण १७८ च्या संख्येने आहेत. शाळ, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, साडी व फेटा अशा स्वरुपात पुरस्कार आहे.
महिला व बाल कल्याण विभागानेही अंगणवाडीतील सेविका व पर्यवेक्षिका यांच्यासाठी दिले जाणारे आदर्श कर्मचारी पुरस्कारही प्रदर्शनातच, समारोपप्रसंगी दि. ८ रोजी आयोजित केले आहेत. सभापती हर्षदा काकडे यांनी कालच ही माहिती दिली. हे पुरस्कार एकूण ८८ च्या संख्येने आहेत.
यापूर्वी हे पुरस्कार दरवर्षी स्वतंत्र समारंभ आयोजित करुन वितरीत केले गेले आहेत. या कार्यक्रमासाठी दोन्ही विभागांकडे स्वतंत्र तरतूद आहे. मात्र, यंदा जि. प.चे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निवडणूक आचारसंहितेमुळे तयार केले असल्याने, यंदाच्या तरतुदीत गेल्या वर्षीपेक्षा कपात झाली आहे. त्या वाढवण्यासाठी दोन्ही सभापती प्रयत्नशील होते.
प्रदर्शनातच होणाऱ्या पुरस्कार वितरणाचे समर्थन करताना जि. प. अध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले की, पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने मोठय़ा संख्येने जिल्ह्य़ातील लोक कार्यक्रमासाठी येतील, त्याचा फायदा महिला बचतगटाच्या उप्तादनाच्या विक्रीस मिळू शकतो व मोठी उलाढाल होऊ शकते, त्यामुळेच हे कार्यक्रम एकत्रित आयोजित करण्यात आले आहेत.