समाजामध्ये कायद्याचा धाक राहिला नसल्याने गुन्हेगारांना बळ मिळत आहे. अशा गुन्हेगारांना सोडण्यासाठी ज्या ज्या लोकांचे दूरध्वनी येतात त्या सर्वाची नोंद स्टेशन डायरीत करा, अशा स्पष्ट शब्दांत जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी पोलिसांना बजावले. देशात कायद्याचे राज्य आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या व अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही केंद्रेकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी केंद्रेकर यांनी पोलीस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांना मंगळवारी एका प्रकरणात संपर्क केला असता ते ठाणेप्रमुखांची आढावा बठक घेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्हाधिकारी यांनी थेट पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून बठकीत दाखल झाले. या वेळी अधीक्षकांसह सर्वच पोलिसांना आश्चर्याचा धक्का बसला. जिल्ह्य़ातील गुन्ह्य़ांचे वाढते प्रमाण, त्यामुळे निर्माण होत असलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, थेट पोलिसांवर झालेला गोळीबार, महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे यात पोलिसांकडून होत असलेला निष्काळजीपणा याचा केंद्रेकर यांनी या वेळी समाचार घेतला.
समाजात ९९ टक्के लोक चांगले आहेत. पण केवळ एक टक्का लोक समाजाला व प्रशासनाला वेठीस धरतात. त्यांच्यामुळे अशांतता निर्माण होते. त्यांचा बंदोबस्त पोलिसांनी केला पाहिजे. प्रशासन घटनेवर चालते. त्यामुळे कोणीही दबावाखाली राहून काम करण्याची गरज नाही. कायद्याच्या चौकटीत राहून काम केले तर दबावाचा प्रश्नही राहत नाही. चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी आपण आहोत, अशी ग्वाही त्यांनी दिली. गुन्ह्य़ांच्या वाढत्या प्रमाणामुळे पोलिसांचा धाकच राहिला नाही. गुन्हे करण्यास गुन्हेगारांनाच बळ मिळत आहे. त्यामुळे अशा गुन्हेगारांना सोडून देण्यासाठी ज्या ज्या लोकांचे दूरध्वनी येतात त्या सर्वाची नोंद स्टेशन डायरीत करा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी ठाणेप्रमुखांना दिल्या. गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या, अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य करताना धमकावणाऱ्यांवरही कडक कारवाई करण्यास कचरू नका, असा विश्वासही दिला. अवैध शस्त्रधाऱ्यांविरुद्ध, जातीय दंगली घडवून आणणाऱ्यांविरुद्ध दक्ष राहून महिला अत्याचाराची प्रकरणे गांभीर्याने घ्या व जनतेत पोलीस प्रशासनाबाबत विश्वास निर्माण करा, असे आवाहन केंद्रेकर यांनी केले.