अखिल भारतीय केमिस्ट अ‍ॅड ड्रगिस्ट संघटनेतर्फे पुकारलेल्या देशव्यापी ‘बंद’मध्ये परभणी जिल्हा औषध विक्रेता संघटनाही सहभागी होणार आहे. नवीन औषधी धोरण ठरवत असताना औषधी विक्रेत्यांचा नफा जशास तसा ठेवून आजपर्यंत मिळत असलेल्या नफ्यामध्ये कोणताही बदल करू नये. फार्मासिस्टच्या उपलब्धतेबाबत राज्यात व देशात जी समस्या निर्माण झाली आहे, त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात यावा, औषध कायदा संशोधन २००८ हा कायदा औषधी विक्रेत्यावर अन्याय करणारा असल्यामुळे त्यात तत्काळ सुधारणा करावी, औषधी विक्रेत्यांच्या क्षेत्रात एफ.डी.आय.ला मान्यता देऊ नये, या मागण्यांसाठी अखिल भारतीय केमिस्ट आणि ड्रगिस्ट संघटनेच्या वतीने उद्या (शुक्रवारी) देशव्यापी बंद पुकारला आहे. यात जिल्हा ड्रगिस्ट अँड केमिस्ट संघटनाही सहभागी होत असून या दिवशी जिल्ह्यातील औषधी दुकाने बंद राहणार आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री, सचिव सूर्यकांत हाके, पवन झांजरी यांनी दिली.