अरविंद केजरीवालप्रणीत आम आदमी पार्टीची सोलापूर जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली असून यात विद्याधर दोशी व चंदूभाई देढिया यांच्यासह पंधराजणांचा समावेश करण्यात आला आहे. राजकीय पक्षांमध्ये असलेली प्रचलित पदे आम आदमी पार्टीत नसून केवळ कार्यकारिणी सदस्यांच्या सहभागातून पक्षाचे कार्य चालणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले.
पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत संस्थापक-सदस विद्याधर दोशी व चंदूभाई देढिया यांच्यासह अ‍ॅड. रामचंद्र रिसबूड, रुद्रप्पा बिराजदार, बाबा शेख, सचिन मस्के, मनोज देवकर, सोहेब तहसीलदार हे सोलापूर शहरातून तर पंढरपूर तालुक्यातून प्रवीण परचंडे, अक्कलकोटमधून केदारीनाथ सुरवसे, करमाळ्यातून शंकर कुलकर्णी, सांगोल्यातून रावसाहेब पवार व दक्षिण सोलापुरातून उमा बिराजदार यांची निवड झाली. लवकरच जिल्हा कार्यकारिणीचा विस्तार करून तीसजणांची समिती नेमण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
पक्षाचे केंद्रीय निरीक्षक प्रल्हाद पांडे व महाराष्ट्राचे निरीक्षक डॉ. गिरधर पाटील (नाशिक), मुंबईचे गजानन खातू व अहमदनगरचे किरण उपकारे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यात आली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्य़ात कार्यकारिणी गठीत करण्याची प्रक्रिया सुरू असून येत्या महिनाअखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होऊन नंतर महाराष्ट्राची कार्यकारिणी गठीत करण्यात येणार असल्याचे पक्षाने प्रसिध्दीसाठी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.