अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाला प्रत्यक्ष कृतीची जोड मिळावी यासाठी जिल्हास्तरावर तंत्रशिक्षण प्रात्यक्षिक केंद्र निर्माण करण्याच्यादृष्टीने काही अंशी कामाला सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री डी. पी. सावंत यांनी दिली. महाराष्ट्रातील संस्थाचालकांनी महाविद्यालयातून कुशल अभियंते तयार करून २०२० मध्ये भारताला महासत्ता बनविण्यात हातभार लावावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. येथील कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
भविष्यात तंत्रशिक्षणाचा राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मोठा वाटा असणार आहे. त्यासाठी ज्ञानवंत अभियंता निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शिक्षण संस्थांवर मोठी जबाबदारी आलेली आहे. शैक्षणिक संस्था व उद्योग यांचा योग्य ताळमेळ साधून संस्थांनी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रयोगशील ज्ञानावर भर दिला तरच भविष्यातील आव्हानाला आपण सामोरे जाऊ शकतो, असे सावंत यांनी सांगितले. प्रारंभी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एन. नांदूरकर यांनी क. का. वाघ शिक्षण संस्थेविषयी माहिती दिली. त्यानंतर बाळासाहेब वाघ यांच्याविषयीचा जीवनपट दाखविण्यात आला. सावंत यांचा संस्थेचे अध्यक्ष वाघ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी मंचावर संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, उपाध्यक्ष काशिनाथदादा टर्ले, विश्वस्त चांगदेवराव होळकर, डी. एस. शिंदे, प्रा. दि. रा. नंदरवार, सचिव प्रा. के. एस. बंदी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्राजक्ता विसपुते आणि प्रा. आर. पी. चुंबळे यांनी केले. आभार शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. व्ही. कर्डिले यांनी मानले.