महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ अर्थात, महाटेक्स या हातमाग शिखर संस्थेद्वारे आयोजित जिल्हास्तरीय हातमाग प्रदर्शनाचे उदघाटन नगर परिषद सदस्य ज्योती कमल मिश्रा यांच्या हस्ते अलीकडेच झाले.
या हातमाग प्रदर्शनाच्या उदघाटन समारंभाच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष योगेश गढीया, उमेशचंद्र हुशे उपस्थित होते. डीडीआर कार्यालयाचे प्रतिनिधी विखार व सामाजिक कार्यकत्रे मंगेश रुईकर हेसुद्धा उपस्थित होते . जिल्हास्तरीय हातमाग कापड प्रदर्शन हे वस्त्र केंद्र सरकारचे आयुक्त हातमाग व राज्य शासनाचा वस्त्रोद्योग विभाग यांच्या संयुक्तिक आर्थिक सहाय्याने चालविण्यात येणारा कार्यक्रम आहे. हातमागचे जे विणकर आहेत त्यांना उत्तम दर्जाची बाजारपेठ मिळावी व बेरोजगारी संपून चांगल्या प्रकारचा रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने आयोजित करण्यात आलेले आहे. हातमागचा प्रसार म्हणजे भारतीय संस्कृतीचा प्रसार होय, अशी यामागील भूमिका आहे.
हे प्रदर्शन उत्सव मंगल कार्यालय अवधुतवाडी दत्त चौकाजवळ ९ मार्च ते २० मार्च या  कालावधीसाठी आयोजित करण्यात आलेले आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंत राहणार आहे. यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणाहून एकूण ३६ हातमाग संस्था सहभागी झालेल्या आहेत. प्रदर्शनात जास्तीत जास्त विक्री व्हावी व यशस्वीरित्या पार पडावे, यासाठी प्रदर्शन प्रमुख सुरेश जाधव यांच्यातर्फे काम पाहण्यात येत आहे. कंत्राटदारांचे प्रतिनिधी प्रवीण बाकलीवाल हे सुद्धा मेहनत घेत आहेत. प्रदर्शनात सहावार, नऊवार साडय़ा, ड्रेस मटेरियल, चादर, बेडशिट, टॉवेल, पंचा, नॅपकीन, कोसा, सिल्क साडय़ा, शर्टिग कापड इत्यादी हातमाग उत्पादने ग्राहकांच्या खरेदीसाठी ठेवण्यात आलेले आहेत.