पुणे जिल्हा नियोजन समितीवर निवडून द्यायच्या ३९ जागांसाठी मंगळवारी ७५ अर्ज दाखल करण्यात आले. समितीवरील आरक्षित जागांवर एकच अर्ज आल्यामुळे महापालिका गटातून दोन तर जिल्हा परिषद गटातून तीनजण समितीवर बिनविरोध निवडून गेले आहेत.
जिल्हा नियोजन समितीसाठी अर्ज भरून देण्याची प्रक्रिया मंगळवारी संपली. समितीवर महापालिका गटातील अनुसूचित जागांवर मीनल सरवदे आणि उल्हास शेट्टी (दोघेही राष्ट्रवादी काँग्रेस), तर जिल्हा परिषद गटात इतर मागास प्रवर्गातून शुक्राचार्य वांजळे, नाना देवकाते (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि बाजीराव सायकर (शिवसेना) यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापालिका गटातून २० जण निवडून द्यायचे असून त्यातील दोन जागांवरील निवड बिनविरोध झाली आहे. उर्वरित १८ जागांसाठी २७ अर्ज दाखल झाले आहेत. तसेच जिल्हा परिषद गटातील १८ जागांसाठी ३० अर्ज आले आहेत.
मनसे, भाजप, शिवसेना युती
पुण्यातून राष्ट्रवादीतर्फे सचिन दोडके, विजया कापरे, काँग्रेसतर्फे कमल व्यवहारे, मिलिंद काची, मनसेतर्फे पुष्पा कनोजिया, युगंधरा चाकणकर, भाजपतर्फे पुण्यातून मंजूषा नागपुरे आणि पिंपरीचे शीतल शिंदे, तर शिवसेनेतर्फे सचिन भगत आणि पिंपरीचे धनंजय अल्हाट यांना पक्षाने संधी दिली आहे. ‘निवडणुकीसाठी मनसे, भाजप आणि शिवसेनेचे ९२ बलाबल झाले असून विजयासाठी ४६.६ मते आवश्यक आहेत. त्या गणितानुसार तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन उमेदवार निवडून जाणार आहेत. त्यामुळे या निवडणुकीत होणारी सौदेबाजी यावेळी निश्चितपणे होणार नाही,’ असा दावा महापालिकेतील विरोधी पक्षनेता वसंत मोरे यांनी ‘लोकसत्ता’ शी केला. मनसेने समितीवर जाणीवपूर्वक महिलांना प्रतिनिधीत्व दिल्याचेही त्यांनी सांगितले.
 जिल्हा नियोजन समितीची ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रारंभी प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे मंगळवारअखेर ७५ अर्ज दाखल झाले. अर्ज भरण्यासाठी समर्थकांसह आलेल्या लोकप्रतिनिधींमुळे जिल्हा परिषदेत निवडणुकीचे वातावरण दिसत होते. अर्जाची छाननी बुधवारी होणार असून त्यावेळी बिनविरोध निवड झालेली नावे जाहीर केली जातील.