विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास अल्प कालावधी शिल्लक राहिल्याने उमेदवारांची होणारी गर्दी पाहता जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वसामान्यांना प्रवेश बंद केला. याची पूर्वकल्पना नसल्याने विविध कामांसाठी आलेल्या अनेकांना माघारी फिरावे लागले. काही नागरिकांचे पोलिसांशी खटके उडाले. विवाह नोंदणीसाठी जाणाऱ्या वधू-वरांची वरात तर चक्क पोलिसांच्या देखरेखीखाली निघाली.
शहरातील चार विधानसभा मतदारसंघासाठी या कार्यालयात अर्ज स्वीकारले जात आहे. यामुळे सध्या परिसरास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. हे अर्ज भरण्यासाठी शनिवार अंतिम मुदत आहे. राजकीय चित्र स्पष्ट झाल्यानंतर शुक्रवारी उमेदवारांनी अर्ज भरण्याची लगबग सुरू केली. एकाचवेळी अनेक उमेदवार अर्ज भरण्यासाठी येणार असल्याने परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला. कामकाजात अडथळा येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर कामे शुक्रवारी बंद ठेवली. याची नागरिकांना माहिती नसल्याने आपल्या कामासाठी आलेल्यांना प्रवेशद्वारातून प्रवेश मिळाला नाही. शासकीय कामांसाठी आलेल्या काही नागरीकांचे या मुद्यावरून पोलिसांशी वाद झाले. काहींना शिधापत्रिकेचा अर्ज जमा करायचा होता, तर काहींना जमिनीच्या व्यवहाराशी संबंधित कागदपत्रांवर कार्यालयात स्वाक्षरी करावयाची होती. कोषागार कार्यालयात सेवा निवृत्ती वेतनाच्या अडचणी, आधी दिलेल्या अर्जाचा पाठपुरावा अशा विविध कामांसाठी दिवसभर नागरिक येत होते. पण, पोलीस यंत्रणेने त्यांना आत जाण्यास मज्जाव केला. यामुळे अनेकांना माघारी फिरावे लागले.
या सर्व गदारोळात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मागील बाजुस असलेल्या विवाह नोंदणी कक्षात उच्चशिक्षीत तसेच उच्चभ्रु कुटुंबातील वधुवरांचा आंतरधर्मीय विवाहाची नोंदणी करण्यात येणार होती. शुक्रवारी नोंदणीची तारीख दिल्यामुळे दोन्हीकडील वऱ्हाडी मंडळी जय्यत तयारी करून आले. मात्र आवारात सर्वसामान्य नागरिकांना बंदी असल्याने त्यांना त्यांची वाहने अशोकस्तंभ परीसरात उभी करावी लागली. या सर्व मंडळींना पोलिसांनी प्रवेश नाकारला. केवळ वधु-वरांना आतील कार्यालयात स्वाक्षरी व तत्सम प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी देखरेखीखाली सोडण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचा विचका झाल्याचे सांगत वधुच्या आईने प्रशासनाच्या नावे बोटे मोडली.