News Flash

चित्ररंग:अस्वस्थ आकांत!

नागर संस्कृतीतील संवेदनांसह जगणाऱ्यांना ग्रामीण आणि त्याहीपेक्षा भटक्यांच्या संवेदनांची कल्पना येणे खूपच लांबची गोष्ट आहे. मात्र सध्या ग्रामीण किंवा अशा वैविध्यपूर्ण पाश्र्वभूमीवरील चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद

| March 17, 2013 12:36 pm

नागर संस्कृतीतील संवेदनांसह जगणाऱ्यांना ग्रामीण आणि त्याहीपेक्षा भटक्यांच्या संवेदनांची कल्पना येणे खूपच लांबची गोष्ट आहे. मात्र सध्या ग्रामीण किंवा अशा वैविध्यपूर्ण पाश्र्वभूमीवरील चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद पाहता ‘आकांत’लाही अशाच प्रतिसादाची अपेक्षा करायला हरकत नाही. हा चित्रपट अस्वस्थ करतो..
बहुतांश शहरी माणसांचे जग अत्यंत सुरक्षित चौकटीत बंदिस्त असते. ठरलेल्या वेळी उठणे, ठरावीक गाडी, ठरावीक ऑफिस, ठरावीक चौकट.. पण पालावर राहणाऱ्या, त्याहीपेक्षा पारध्याच्या जन्माला आलेल्यांच्या जगण्याला चौकटच नसते. शहरी कल्पनेच्या पल्याड जगणाऱ्या या पालावरच्या पारध्यांची एक प्रेमकहाणी, गहाणवटीची अत्यंत रानटी प्रथा आणि त्याकडेही जगण्यातील अपरिहार्यता म्हणून पाहणारे पारधी यांचे चित्रण म्हणजे ‘आकांत’!
पाडय़ावर इतर पारध्यांबरोबर राहणारा चवल्या (मिलिंद शिंदे) हा इतर पारध्यांच्या दृष्टीने अत्यंत नालायक आहे. कारण त्याला चोऱ्यामाऱ्या करता येत नाहीत की, कोणाचा खूनही करता येत नाही. चवल्याची बायको झुरमी (अदिती सारंगधर) ही पाडय़ावरची देखणी बाई आहे. दोघांचाही एकमेकांवर खूप जीव आहे. चवल्याने गावच्या पाटलाकडून (अन्वय बेंद्रे) अनेकदा पैसे उधारीवर घेतले आहेत. हा पाटील पालावरच्या पारध्यांचा रक्षणकर्ता आहे. चोऱ्यामाऱ्या केलेल्या या पारध्यांना पोलिसांनी पकडले की, पाटील आपले राजकीय वजन वापरून त्यांची सुटका करतो. त्यामुळे पालावरच्या अनेकांवर त्याचे उपकार आहेत.
या पाटलाकडे चवल्याचे खूप कर्ज आहे आणि पाटलाची नजर झुरमीवर पडते. मात्र पाटील कोणतीही जबरदस्ती करत नाही. केवळ कर्जाच्या बदल्यात झुरमीला आपल्याकडे गहाण ठेवण्याचा किंवा दिलेल्या मुदतीत कर्ज व्याजासह फेडण्याचा प्रस्ताव चवल्यासमोर ठेवतो. चवल्या पैसे मिळवण्यासाठी मेहनतीने काम करण्यापासून ते चोऱ्यामाऱ्या करण्यापर्यंत सगळे पर्याय चाचपून पाहतो. मात्र चोरी केल्यानंतर तो पकडला जातो आणि पुन्हा त्याला सोडवायला झुरमीला पाटलाचे पाय पकडावे लागतात. चवल्या दगडाच्या खाणीत कामाला लागतो, तर खाणमालक त्याला पैसे न देताच आपला व्यवसाय गुंडाळतो. शेवटी चवल्याच्या हाती कोणताही मार्ग उरत नाही आणि झुरमी पाटलाकडे सहा महिन्यांसाठी गहाण म्हणून जाते. पाटलाच्या बायकोला (दीपा चाफेकर) ही गोष्ट कळल्यानंतर ती पाटलाला जाब विचारते. मात्र झुरमीच्या प्रेमात वेडा झालेला पाटील तिलाही घराबाहेर काढतो. दरम्यान झुरमीला पाटलापासून दिवस राहतात आणि तिची गहाणवटीची मुदत संपते. पुढे चवल्या तिला पुन्हा स्वीकारतो का, पालावरचे पारधी तिला स्वीकारतात का, पाटलाचे काय होते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा.
चित्रपटाचे कथानक चांगले आहे. मात्र त्यात गहाणवटीची ही प्रथा कोणत्याही पात्राला खटकलेली वाटत नाही. कदाचित ही प्रथा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाल्यानेही त्यांना काहीच फरक पडत नसावा. पण विशेष म्हणजे पाटलाला झुरमीबद्दल वाटणारे प्रेम, चवल्याचा नाकर्तेपणा आणि झुरमीची असहायता यामुळे बघणाऱ्या प्रेक्षकालाही गहाणवटीची दाहकता जाणवत नाही. झुरमी सहा महिने पाटलाला शरण जाते. चवल्या पाटलाच्या जिवावर उठतो, त्या वेळी चवल्याच्या जिवाची काळजी करत पाटलाला वाचवतेही. दुसऱ्या बाजूला सहा महिने झाल्यानंतर झुरमी जाणार म्हणून पाटील व्यथित होत रडतोही. आपल्या पत्नीच्या पोटात पाटलाचा वंश वाढतोय, हे ऐकून चवल्याचीही चिडचिड होते. दिग्दर्शकाने या पटकथेला खूपच चांगले वळण दिले आहे.
मुलीच्या वयाच्या झुरमीला घास भरवतानाच नेमकी पाटलाची मुलगी घरात येते, त्या वेळी पाटलाला वाटलेली खंत, झुरमी आपल्या खोपटात चवल्याच्या हातांना तेल लावत असताना दुसऱ्याच दृश्यात पाटलाची बायको त्याचे पाय चेपत आहे. मात्र पाटलाला त्याचे काहीच कौतुक नाही, हे दृश्य खूप मस्त परिणाम साधते. त्याशिवाय प्रकाशयोजनाही उत्तम साधली आहे. दिग्दर्शकाने कॅमेऱ्याच्या कामात फार काही करामत न करता बेसिक्सवर भर दिला आहे. संकलनही चांगले झाले आहे.
चित्रपटात पटकथा व कथानकाखालोखाल महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्वच पात्रांचा अभिनय. मिलिंद शिंदे यांनी चवल्याची असहायता, त्याचा संताप, भीती या गोष्टी आपल्या राकट चेहऱ्याद्वारे आणि निरागस नजरेतून खूप मस्तच मांडल्या आहेत. अदिती सारंगधरच्या वाटय़ाला खूप वर्षांनी अशी आव्हानात्मक भूमिका आली. एकांकिका स्पर्धापाठोपाठ छोटय़ा पडद्यावरही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अदितीने या चित्रपटात आपले सर्वस्व ओतले आहे. झुरमी तिला चांगलीच गवसली आहे. अन्वय बेंद्रे यांनीही जयसिंग पाटील या भूमिकेत काळे-पांढरे यांच्यातील मधली शेड उत्तम दाखवली आहे. या तिघांव्यतिरिक्त इतरांनीही आपापल्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत.
नितीन मावाणी प्रस्तुत आकांत
निर्माता – मधुकर भानगिरे, पटकथा-संवाद-दिग्दर्शन – मानसिंग पवार, कथा – प्रा. रामनाथ चव्हाण, छायालेखन – प्रकाश शिंदे, संकलन – पी. वाय. मांजरेकर, संगीत व पाश्र्वसंगीत – प्रवीण कुंवर, कलावंत – मिलिंद शिंदे, अदिती सारंगधर, अन्वय बेंद्रे, दीपा चाफेकर, राजीत गोविलकर, संतोष भोसले, गजानन भिसे, अरुण खंडागळे, दिलीपराज.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2013 12:36 pm

Web Title: disturbed howling
Next Stories
1 चित्ररंग:व्यवस्थेवर चुरचुरीत भाष्य
2 चित्रगीत
3 नाट्यरंग : घराणेशाहीचे रंजक विडंबन
Just Now!
X