01 March 2021

News Flash

नियोजनशुन्यतेचा दुभाजकांवर हातोडा

पहिल्याच पावसात शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहिलेले पाण्याचे लोट लक्षात घेऊन पालिकेने त्यावर काही ठोस उपाय करण्याऐवजी जे अस्तित्वात आहे, त्यावर हातोडा घालण्याची कार्यपद्धती अवलंबिली

| June 19, 2013 09:32 am

पहिल्याच पावसात शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहिलेले पाण्याचे लोट लक्षात घेऊन पालिकेने त्यावर काही ठोस उपाय करण्याऐवजी जे अस्तित्वात आहे, त्यावर हातोडा घालण्याची कार्यपद्धती अवलंबिली आहे. गंगापूर रस्त्यावरील अस्ताव्यस्तपणे तोडण्यात आलेला रस्ता दुभाजक हे त्याचे ठळक उदाहरण. आधी कोणताही विचार न करता उभारलेला हा दुभाजक अडचणीचे ठरल्याने वाटेल तिथे फोडण्याचा मार्ग अनुसरण्यात आला आहे. पालिकेच्या उरफाटा कारभाराचा हा नमुना.
नैसर्गिकपणे पाणी वाहून नेणाऱ्या मार्गावर ठिकठिकाणी झालेली अतिक्रमणे आणि तुंबलेल्या गटारी याची परिणती पहिल्याच पावसात शहरातील प्रमुख रस्ते व परिसर पाण्याखाली जाण्यात झाल्याचे उघड झाले होते. शहरातील अनेक भागात तेव्हा मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पद्धतीने पाणी साचण्यात अनेक ठिकाणी पालिकेची नियोजनशुन्यताच कारणीभूत ठरली. मल्हारखाण ते सरकारवाडा पोलीस ठाणे या गंगापूर रस्त्यावरील एका बाजुकडून पाण्याचे लोट वाहत होते. तशीच स्थिती पुढे डोंगरे वसतीगृहासमोरील रस्त्यावर होती. परिणामी, गंगापूर रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी बंद करणे भाग पडले. या रस्त्यांवर उभारलेल्या लांबच लांब दुभाजकामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर पालिकेने पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी थेट दुभाजकावर हातोडा मारण्यास सुरूवात केली आहे. ज्या ज्या ठिकाणी पावसाचे पाणी त्या ठिकाणचा दुभाजक अस्ताव्यस्तपणे तोडण्यात आले आहेत.
जेव्हा या रस्त्यावर दुभाजकाची उभारणी केली गेली, तेव्हा पालिकेच्या तज्ज्ञ अभियंत्यांना पावसाळ्यात तेच अडथळे ठरतील ही बाब लक्षातही आली नाही. दुभाजकाची निर्मिती करताना अशी ठिकाणे शोधून तिथे पाणी जाण्यासाठी व्यवस्था करता येणे शक्य होते. परंतु, त्याचा साधा विचारही केला गेला नाही.
आता पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यामुळे गदारोळ उडाल्यानंतर पालिकेने या दुभाजकावर हातोडा घालण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळ्याचा हंगाम संपल्यावर
पुन्हा या दुभाजकांच्या डागडुजीसाठी निविदा निघतील आणि पुढील पावसाळ्यात तो फोडण्याची व्यवस्था केली जाईल, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 19, 2013 9:32 am

Web Title: dividers of road breaks in rainy season
टॅग : News
Next Stories
1 मातृत्व अनुदान योजनेचे नंदुरबार जिल्ह्यात तीनतेरा
2 महाविद्यालयांमधील जागांच्या तुलनेत दुप्पट प्रवेश अर्ज
3 संपकरी इंधन वाहतूकदारांचा आत्मदहनाचा इशारा
Just Now!
X