महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ नाशिक विभागाच्या वतीने ६२ व्या नाटय़ महोत्सवाच्या प्राथमिक फेरीस येथील महाकवी कालिदास कलामंदिरात २ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. ही फेरी २९ जानेवारीपर्यंत सुरू राहणार असून स्पर्धेमध्ये नाशिक, जळगाव या जिल्ह्य़ांमध्ये कार्यरत कामगार कल्याण भवन, ललित कला भवन व कामगार कल्याण केंद्रातील एकूण १८ नाटय़संघांनी प्रवेश नोंदविलेला आहे.
स्पर्धेतील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे नाटक महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने मुंबई येथे आयोजित राज्यस्तरीय नाटय़ महोत्सवाकरिता पात्र ठरणार आहेत. त्यामुळे प्राथमिक नाटय़ महोत्सवामध्ये सहभागी १८ नाटय़संघांमध्ये चुरस राहणार आहे. प्राथमिक फेरीचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता नाशिक विभागाचे कामगार उपआयुक्त राजाराम जाधव यांच्या हस्ते आणि अखिल भारतीय नाटय़ परिषद शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उद्घाटनप्रसंगी गांधीनगर वसाहतीतील कामगार कल्याण केंद्राचे ‘छिन्नमस्ती’ हे नाटक सादर होणार आहे.
 ५ जानेवारी रोजी दीपनगर मंडळाचे ‘गोळ्या काढलेलं पिस्तूल’, ६ जानेवारी रोजी नेहरूनगर केंद्राचे ‘ट्रिपल एक्स’, ७ रोजी एकलहरे केंद्राचे ‘मी सारथी परंपरेचा’, ८ रोजी विहितगाव वसाहत केंद्राचे ‘सखाराम बाइंडर’, ९ रोजी पिंप्राळा केंद्राचे ‘विठ्ठला’, १२ रोजी सिन्नर केंद्राचे ‘कहाणी एका हृदयाची’, १३ रोजी सातपूर वसाहत केंद्राचे ‘हम तो तेरे आशिक हैं’, १४ रोजी सिडको वसाहत भवनाचे ‘नथिंग टू से’, १५ रोजी पाचोरा केंद्राचे ‘डबल गेम’, १६ रोजी ओझर केंद्राचे ‘माणूस’, १९ रोजी सिडको भवनाचे ‘लास्ट लव्ह स्टोरी’, २० रोजी जळगावच्या जोशी कॉलनीचे ‘टू इज कंपनी’, २१ रोजी शाहूनगरचे ‘मास्टर माइंड’, २२ रोजी नाशिकच्या बुधवार पेठ केंद्राचे ‘वा गुरू’, २३ रोजी देवळाली गाव केंद्राचे ‘समोरच्या घरात’, २७ रोजी सातपूर कामगार भवनाचे ‘एक रिकामी बाजू’, तर २८ रोजी मालेगाव केंद्राचे ‘गुन्हेगार कोण’ हे नाटक होणार आहे. नाटय़ रसिकांनी या स्पर्धेस मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन विभागाचे साहाय्यक कल्याण आयुक्त संजय धुमाळ यांनी केले आहे.