विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता लक्षात घेऊन गणेशोत्सवामध्येच बोनसची घोषणा करणाऱ्या महापालिकेने घरोघरी फिरून मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य स्वयंसेविकांना दिवाळी संपल्यानंतर हातावर सानुग्रह अनुदानाच्या टिकल्या टेकविल्या. पालिका प्रशासनाच्या या अनागोंदी कारभारामुळे दिवाळी अंधारातच साजरी करावी लागलेल्या स्वयंसेविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. दरम्यान, आपल्या मागण्यांकडे कानाडोळा करणाऱ्या प्रशासनाला धडा शिकविण्याचा निर्धार या महिलांनी केला आहे.
कुटुंब नियोजनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य स्वयंसेविकांवर मुंबईकरांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे कामही सोपविण्यात आले आहे. डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी घरोघरी फिरीन पाण्याच्या पिंपात औषध टाकण्यापासून साथीच्या आजारांचे रुग्ण शोधून त्यांना उपचारासाठी पालिकेच्या दवाखान्यात घेऊन येण्यापर्यंतची कामे आरोग्य स्वयंसेविकांना करावी लागतात.
रुग्ण शोध मोहीम आणि पाण्याच्या पिंपात औषध टाकण्यासाठी दर दिवशी या महिलांना किमान १०० घरे फिरावी लागतात. मध्यमवर्गीयांच्या चाळी असो वा झोपडपट्टी सकाळ झाली की या महिला आपापल्या कामाला लागतात. परंतु महिना अखेर त्यांना केवळ ४५०० रुपये मानधन दिले जाते. पालिका कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक काम करूनही त्यांची केवळ मानधनावरच बोळवण केली जाते. पालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे इतर कोणतेही फायदे त्यांना मिळत नाहीत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्याची शक्यता लक्षात घेऊन महापालिकेने गणेशोत्सवादरम्यान कर्मचाऱ्यांच्या बोनसची घोषणा केली होती.
मात्र प्रत्यक्षात दिवाळीच्या आदल्या दिवशी कर्मचाऱ्यांच्या हाती बोनस पडला. मात्र आरोग्य स्वयंसेविका बोनसच्या प्रतीक्षेतच होत्या.
दिवाळीच्या पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी बोनस मिळेल अशी भाबडी आशा त्यांना होती. परंतु चक्क दिवाळी संपल्यानंतर सोमवारी पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये आरोग्य स्वयंसेविकांच्या बोनसची रक्कम पोहोचती झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आरोग्य स्वसंसेविकांना बोनस घेऊन जाण्याचा निरोप धाडला.
दिवाळीत आपल्या कच्च्याबच्च्यांना काहीच घेता न आल्यामुळे संतापलेल्या आरोग्य स्वयंसेविकांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत बोनसरुपात मिळालेले ३,७०० रुपये स्वीकारले.
उन्हातान्हात, मुसळधार पावसाची तमा न बाळगता साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आम्ही राबतो. पण पालिका प्रशासनाला दिवाळीचा बोनसही वेळेवर देता येत नाही. मानधनात वाढ करण्याची आणि पालिका सेवेत कायम करण्याच्या मागणीला प्रशासनाकडून वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या आहेत. आमची दिवाळी अंधारात घालविणाऱ्या अधिकाऱ्यांनी आमच्या मागण्या लवकरात लवकर धसास लावल्या नाहीत, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल, असा इशारा या स्वयंसेविकांनी दिला आहे.