दीपावलीनिमित्त विविध रंगांची उधळण सुरू झाली असली तरी या उत्सवाला सूरमयी साज चढविला जाणार आहे तो, शुक्रवारी दिवाळी पहाट, दिवाळी पाडव्याच्या आयोजित मैफलींनी. नेहमीप्रमाणे यंदाही या कार्यक्रमांसाठी उत्तर महाराष्ट्रातील विविध सार्वजनिक मंडळे, संस्था व संघटनांनी पुढाकार घेतल्याने ही पहाट खऱ्या अर्थाने सूरमयी बनणार आहे. दिवाळीतील पाडवा पहाट आणि संगीताची मैफल हे गेल्या काही वर्षांत अतूट बनलेले नाते यंदा अधिक दृढ होणार आहे.
नाशिकच्या सांस्कृतिक क्षितिजावर दरवर्षी अविस्मरणीय पाडवा पहाट फुलविणाऱ्या संस्कृतीच्या पिंपळपारावर यंदा सानिया पाटणकर यांच्या स्वरांचा साज चढणार आहे. पिंपळपारावरील स्वरोत्सवाचे हे १५ वे वर्ष आहे. जयपूर अत्रौली घराण्याच्या प्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर यांच्या गायनाने मैफल सजणार आहे. पुण्याच्या संगीतप्रेमी कुटुंबात जन्मलेल्या सानिया यांनी लीलाताई घारपुरे, डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे या गुरूंकडे संगीत शिक्षण घेतले. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, स्व. पंडित हिराबाई बडोदेकर, पंडित जसराज, उस्ताद अली अकबर खान, पंडित गंगुबाई हनगल, प्रभा अत्रे यांच्या आशीर्वादाने सानिया यांचे गाणे उत्तरोत्तर प्रगल्भ झाले. त्यांची पिंपळपारावर होणारी मैफल रसिकांना मंत्रमुग्ध करील, असा विश्वास संस्कृतीचे अध्यक्ष शाहू खैरे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी पहाटे पाच वाजता हा स्वरोत्सव होणार आहे. या सोहळ्यात प्रसिद्ध चित्रकार तथा दिग्दर्शक सुनील धोपावकर यांना यंदाचा संस्कृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. एम्पथी फाऊंडेशन आणि बाबाज थिएटर यांच्यातर्फे सकाळी सव्वापाच वाजता पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगेशकर यांच्यासोबत प्रसिद्ध गायिका मीना परुळेकर-निकम सहभागी होणार आहेत. गंगापूर रस्त्यावरील नवशा गणपती मंदिरासमोरील आनंदवन (साठे नर्सरी) येथे हा कार्यक्रम होईल. नाशिक रोड येथील ऋतुरंग परिवारातर्फे सायंकाळी सहा वाजता सांज पाडवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बासरीवादक रवींद्र जोशी यांचे वेणुवादन, संगीताचा कार्यक्रम होणार आहे. शास्त्रीय संगीत, जुनी-नवी हिंदी-मराठी गीते आणि जुगलबंदी अशी या कार्यक्रमाची रचना आहे. राजीवनगर येथील युनिक ग्रुपतर्फे पहाटे साडेपाच वाजता भगवती चौक येथे दिवाळी पाडवा पहाट मैफल होईल. गायक संजय बानुबाकोडे प्रस्तुत जिव्हाळ्याची गाणी या भावगीत, भक्तिगीत, अभंग व लोकगीतांच्या कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. कार्यक्रमास अभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित राहणार आहे. गंगापूर रोड येथील नसती उठाठेव मित्र परिवाराच्या वतीने पहाटे साडेपाच वाजता दीपावली पहाटचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष आहे. कृष्णराव मुजुमदार यांच्या शिष्या पंडित कल्पना झोकरकर यांच्या गायनाचा कार्यक्रम नरसिंहनगर येथील हनुमान मंदिराच्या आवारात होईल. संवादिनीवर पंडित भरत कामत, तर तबल्यावर सुभाष दसककर साथ देतील. रसिकांनी मैफलीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन परिवाराचे अध्यक्ष बापू कोतवाल यांनी केले आहे.