गुलाबी थंडीत उबदार पांघरून घेत, उगवत्या सूर्याच्या साक्षीने स्वरांची होणारी मुक्त उधळण शहरवासियांवर दीपावली पाडव्या निमित्त झाली. सामाजिक संस्था, संघटनांच्या वतीने शहरात पहाट पाडवा मैफलींसह सांज पाडव्याचेही आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेच्या वतीने मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे आपले पाडव्याचे कार्यक्रम रद्द केले.
दरम्यान, मुंबई नाका येथील युवक मित्र मंडळाच्या वतीने स्वप्नील बांदोडकर यांचा ‘राधा ही बावरी’ कार्यक्रम शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे स्थगित करण्यात आला.
माजी उपमहापौर प्रा. देवयानी फरांदे व माजी नगरसेवक सुहास फरांदे यांच्या पुढाकारातून पंडित शौनक अभिषेकी यांच्या मैफलीचे गंगापूर रस्त्यावरील प्रमोद महाजन उद्यानात गुरूवारी आयोजन करण्यात आले होते. अभिषेकी यांना ऐकण्यास रसिकांनी गर्दी केली होती. मैफलीची सुरूवात भूपाल तोडीने ‘नय्या उतारो पार’ या गीताने झाली. यानंतर त्रितालातील ‘कहिसे रिझाओ’ ही बंदीश त्यांनी सादर केली. ‘लागे कलिजेपे कटार’ या ठुमरीने रसिकांची दाद मिळवली. खास रसिकांच्या आग्रहास्तव सुहास्य तुझे, या सुरांनो चंद्र व्हा, ही नाटय़गीते अभिषेकी यांनी सादर केली. आधी रचली पंढरी, अभिर गुलाल उधळीत, नाही पुण्याची मोजणी, यासारख्या अभंगाने रसिक भक्तीरसात न्हाऊन निघाले. मैफलीचा समारोप ‘सर्वात्मका शिवसुंदरा, गंगाधरा सर्वेश्वरा’ या भैरवीने झाला. उत्तरोत्तर रंगलेल्या मैफलीला नीलेश पांडे, मुदूला तांबे, अ. भा. पुरोहित, नेहा देशपांडे यांनी स्वरसाज चढविला. तर, हर्षद कानेटकर, उदय कुलकर्णी, दिगंबर सोनवणे, अतुल गरूड यांनी संगीत साथ केली. यावेळी नगरसेविका प्रा. देवयानी फरांदे, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल, भाजप शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी, विजय साने, आदी उपस्थित होते.
नाशिकच्या सांस्कृतिक क्षितिजावर दरवर्षी अविस्मरणीय पाडवा पहाट फुलविणाऱ्या संस्कृती नाशिक संस्थेतर्फे यंदा स्थानिक दिग्गज कलावंतांचा स्वराविष्कार उपस्थितांनी अनुभवला. बुधवारी पहाटे पाच वाजता पिंपळपारावर ही मैफल रंगली. प्रसाद खापर्डे, मकरंद हिंगणे, अविराज तायडे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांना पंडित सुभाष दसककर, नितीन वारे यांनी संगीत साथ केली. एकिकडे स्वरांची आराधना करणाऱ्या कलावंतांसह रंगभूमी व रूपेरी पडद्यावर चमकणाऱ्या नाशिककर स्त्री कलावंतांचा गौरव सोहळा ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमात करण्यात आला. यामध्ये दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे सुवर्णपदक मिळविणारी अंजली पाटील, प्रायोगिक रंगभूमी गाजविणारी अनिता दाते, दुरदर्शन मालिका ते चित्रपटसृष्टी असा प्रवास करणारी नेहा जोशी, दुरचित्रवाणीवरील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल दुसानिस, नृत्यविशारद भक्ती देशपांडे, गायिका मीना निकम यांचा समावेश आहे. कार्यक्रमास संस्थेचे सर्वेसर्वा शाहू खैरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
गंगापूर रोडवरील नसती उठाठेव मित्र परिवारातर्फे आयोजित दीपावली पहाट कार्यक्रमात पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य विजय कोपरकरांच्या स्वरांची जादू उपस्थितांनी अनुभवली. बैरागी भैरव रागातील विलंबित एक तालातील ‘मोरे मन बसो राम’ या ख्यालने मैफली, सुरुवात झाली. ‘घेई छंद मकरंद’ या स्वरातील आरोह-अवरोहाने तर रसिकांवर गारूड केले. बगळ्यांची माळ फुले गाताना, मधु मिलनात, यांसारख्या नाटय़गीतांनी मैफलीची रंगत वाढविली. मैफलीचा समारोप ‘सर्वात्मका शिवसुंदरा’ या भैरवीने झाला. त्यांना तबल्यावर श्रीकांत भावे व संवादिनीवर राजू परांजपे यांनी संगीत साथ केली. युनिक ग्रुपच्यावतीने बुधवारी पहाटे साडेपाच वाजता कवी सौमित्र तथा किशोर कदम यांची काव्यमैफल राजीवनगर येथील मैदानावर झाली. दरम्यान, मुंबई नाका येथील युवक मित्र मंडळाच्या वतीने भाऊबीज पाडवा पहाटनिमित्त स्वप्नील बांदोडकर यांचा ‘राधा ही बावरी’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. हा कार्यक्रम नंतर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आ. वसंत गिते यांनी दिली.