कानांचे पडदे फाडणाऱ्या सुतळी बॉम्बचा आवाज पहिल्यांदाच कमी झाला आहे. आवाजाच्या प्रदूषणाविरोधात सातत्याने होत असलेल्या पाठपुराव्यामुळे बाजारात असलेल्या प्रमुख ब्रॅण्डच्या सुतळी बॉम्बचे आवाज आवाजाच्या मर्यादेखाली आले आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व आवाज फाऊंडेशन यांनी केलेल्या चाचणीमध्ये एकीकडे ही सकारात्मक बाजू दिसून आली आहे. मात्र त्याच वेळी रॉकेटचा आवाज सुतळी बॉम्बपेक्षा अधिक असल्याची नोंद झाली.
निवडणूक निकालामुळे दिवाळीआधीच रविवारी फटाक्यांची आतषबाजी होणार आहे. मात्र दरवेळी फटाक्यांच्या रांगेत आवाजासाठी सर्वात पुढे असलेला सुतळी बॉम्बचा आवाज मात्र यावेळी बसला आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या स्टॅण्डर्ड, शमा आणि व्होल्कॅनो या तिन्ही ब्रॅण्डच्या सुतळी बॉम्बनी पहिल्यांदाच आवाजाची पातळी खाली आणली आहे. सर्वात मोठा आवाज स्टॅण्डर्डच्या सुतळी बॉम्बचा (१०८ डेसिबल) झाला. इतर बॉम्बचे आवाज ८०-८५ डेसिबलपर्यंत होते. गेल्यावर्षीपर्यंत सुतळी बॉम्बचे आवाज १२५-१२७ डेसिबलपर्यंत जात असत. ध्वनिनियमन कायद्यानुसार फटाक्यांच्या आवाजाची मर्यादा १२० डेसिबल ठरवण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जनसंपर्क अधिकारी संजय भुस्कुटे यांनी दिली.
सुतळी बॉम्बचा आवाज कमी झाला असला तरी माळेच्या फटाक्यांचा आवाज मात्र मर्यादेपसलीकडेच राहिला. स्टॅण्डर्डच्या २००० शेल या माळेने सर्वात मोठा आवाज, १२३ डेसिबल, नोंदवला. त्याखालोखाल गोल्ड बोनान्झा या माळेने १२० डेसिबल आवाज केला. फटाक्यांच्या माळेसाठी १०५ डेसिबल मर्यादा ठरवण्यात आली आहे.
फटाक्यांच्या सर्व प्रकारात आवाजाबाबत तिसरा क्रमांक रॉकेटचा होता. विनायक फायरवर्क्‍सच्या स्वीट १६ या रॉकेटचा आवाज ११७ डेसिबलपर्यंत पोहोचला. रॉकेट केवळ दृष्यपरिणाम देत असल्याचा गैरसमज आहे. ते उंचावर जाऊन फुटत असले तरी त्याचा आवाज नेहमीच मोठा असतो हे आतापर्यंतच्या प्रत्येक चाचणीवरून दिसून आले आहे. यावेळी तर सुतळी बॉम्बपेक्षाही रॉकेटचा आवाज मोठा असल्याची नोंद झाली, असे आवाज फाऊंडेशनच्या संस्थापक सदस्य सुमायरा अब्दुलाली यांनी सांगितले. फटाक्यांचे प्रकार आवाजाच्या मर्यादेत असले तरी ८० डेसिबलपेक्षा अधिक आवाज सातत्याने कानावर पडत राहिल्यास त्याचा ध्वनिक्षमतेवर परिणाम होतो हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.