अतिदुर्गम पाडय़ातील आदिवासींना दिवाळीची भेट देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे येथील नेचर क्लब ऑफ नाशिक, केटीएचएम महाविद्यालय, ज्ञानदीप मंडळ, अण्णासाहेब मुरकुटे सांस्कृतिक विकास मंडळ, शिवकार्य गडकोट मोहीम, आनंद अकौन्टसी क्लासेसचे आजी-माजी विद्यार्थी मंच यांच्या वतीने शहरातील गंगापूर व शरणपूर रस्ता परिसरात ‘एक करंजी दोन लाडू, अनाथ अपंगांशी नाते जोडू’ हा उपक्रम राबविण्यात आला.
उपक्रमाचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष असून शहरातील ४० मंडळांनी या उपक्रमात सहभाग घेतला. जमा झालेला फराळ संत गाडगे महाराज धर्मशाळेच्या माध्यमातून अतिदुर्गम पाडय़ावर पाठविला जातो. विशेष म्हणजे या उपक्रमात विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी घराघरात जाऊन दिवाळीचा फराळ व कपडे जमा करतात. या उपक्रमात माजी उपमहापौर अ‍ॅड. मनीष बस्ते, शिवकार्य गडकोट मोहिमेचे राम खुर्दळ, नीलेश सोनवणे, प्रा. आनंद बोरा आदी मान्यवर सहभागी झाले.
संत गाडगे महाराज ट्रस्टतर्फे अंध, अपंगांना फराळ वाटप
नाशिकमधील संत गाडगे महाराज ट्रस्टतर्फे सुमारे ४०० अंध व अपंगांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यासह अत्तर, गुलाबपुष्प, तेल, साबण देण्यात आले. या वेळी विभागीय महसूल आयुक्त रवींद्र जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक धनंजय कमलाकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेविका वत्सला खैरे, वसंतराव चव्हाण संजय नागरे, प्रदीप पाचपाटील उपस्थित होते. या वेळी जाधव यांनी गाडगे महाराज ट्रस्टमध्ये शारीरिकदृष्टय़ा अपंग व गरजू व्यक्तींसाठी अन्नदानाचे सेवाव्रत ७८ वर्षांपासून सातत्याने सुरू असल्याबद्दल गौरवोद्गार काढले.
नशाबंदी मंचचा ‘एक लाडू दोन करंजी’ उपक्रम
नाशिक जिल्हा नशाबंदी मंचच्या वतीने समाजातील उपेक्षित व्यक्तींना दिवाळीनिमित्त ‘एक लाडू दोन करंजी’ उपक्रमांतर्गत गंगाघाटावरील वस्तीत राहणाऱ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गं. पा. माने होते. प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश आहेर, सुनंदा मोरे, कुसुम चव्हाण उपस्थित होते. या वेळी आहेर यांनी सामाजिक बांधीलकी जपण्याच्या हेतूने संस्थेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. माने यांनी ज्यांना आर्थिक विवंचना प्रामुख्याने भेडसावते त्यांच्यासाठी मंचने राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.