दिवाळी अंकाची परंपरा ही सुमारे १०६ वषार्ंपासून सुरू आहे. या दिवाळी अंकांनीच लेखकांना घडविले-जोपासले, असे मत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केले. अक्षरधारा, राजहंस प्रकाशन, मांडके हिअरिंग सव्‍‌र्हिसेस आणि तेजज्ञान फाउंडेशन आयोजित ‘मायमराठी’ शब्दोत्सवामध्ये दिवाळी अंकाच्या विशेष दालनाचे उद्घाटन डॉ. माधवी वैद्य व समीरण वाळवेकर यांच्या हस्ते झाले; त्या वेळी डॉ. वैद्य बोलत होत्या.
डॉ. वैद्य म्हणाल्या की, दिवाळी अंकांचे स्थान मराठी साहित्यात विशेष आहे. का. र. मित्र यांनी सुरू केलेल्या ‘मनोरंजन’ या पहिल्या दिवाळी अंकापासून आज जवळपास २७५ च्या आसपास संख्येने प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांची मोठी परंपरा आहे. मराठी माणूस या साहित्य प्रकाराची खूप आतूरतेने वाट बघत असतो. साहित्याबरोबरच या दिवाळी अंकाचे बाह्य़ स्वरूप बदलेले आहे. दृकश्राव्य माध्यमातूनही दिवाळी अंकांचे दर्शन घडते आहे. चांगले साहित्य समोर ठेवले तर उत्तम वाचक नक्कीच आहेत. तरुण पिढीसुद्धा उत्तम वाचते आहे,उत्तम बोलते आहे आणि उत्तम लिहितेसुद्धा आहे. दृकश्राव्य माध्यम, वाचन संस्कृतीमध्ये होणारे बदल याकडे आपण सर्वानीच जाणीवपूर्वक सजगतेने बघण्याची गरज आहे, असे वाळवेकर यांनी म्हटले व अक्षरधाराला शुभेच्छा व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अक्षरधारा बुक गॅलरीच्या संचालिका रसिका रमेश राठिवडेकर यांनी ग्रंथभेट देऊन स्वागत केले व शेवटी आभार मानले. दिवाळी अंकांच्या या दालनात २५० हून अधिक दिवाळी अंक मांडण्यात आले असून, त्यावर विशेष सवलतही दिली जात आहे.