भुपाळीपासुन भैरवीपर्यंत रंगलेल्या चैतन्य फौंडेशनच्या ‘एक दिवाळी पहाट वेळी’ या स्वर-तालांच्या मैफलीने नगरकरांच्या दिपोत्सवास सुरुवात झाली. रसिकांनीही मैफलीस उदंड प्रतिसाद देत कार्यक्रमाचे कौतुक केले.
दिवाळीनिमिमत्त चैतन्य फौंडेशन दरवर्षी ‘दिवाळी पहाट..’ कार्यक्रम आयोजित करते. यंदाही वसुबारसेच्या मुहुर्तावर आज पुन्हा एकदा मराठी गीतांची ही मैफल सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीच्या सभागृहात रंगली. हिंदोळा (पुणे) प्रस्तुत व प्रशांत पांडव निर्मित ‘माझा मराठीची बोल कौतुके’ हा सुरेल संगीत प्रवास निवेदक रवींद्र खरे यांच्या रसाळ निवेदनाने उलगडला. साथीला प्रमोद रानडे, कुमार करंदीकर, संपदा थिटे, मिनल पोंक्षे यांच्या गायनास व प्रशांत पांडव, हरिदास शिंदे, पराग पांडव, सत्यजित सराफ यांनी वाद्याची संगत केली. वाद्यांच्या जुगलबंदीनेही रसिकांची वाहवा मिळवली.
‘वासुदेव आला’, ‘शुभ मंगलचरणी’, ‘रात काळी’, ‘अरे कृष्णा’, ‘दार उघड बया’, ‘उदे गं अंबे उदे’, ‘पिकल्या पानाचा’, ‘राजसा जवळी जरा बसा’, ‘विश्वाचे अर्ज’, ‘मनमोराचा पिसारा फुलला’, ‘स्वरगंगेच्या काठावरती’ या भुपाळी गण, गवळण, गोंधळ, कोळी गीते, पोवाडा, भक्तीगीते, भजने, भावगीतांच्या नजराण्यास दाद मिळाली. महापौर शिला शिंदे, माजी आमदार राजीव राजळे, जि. प. उपाध्यक्ष मोनिका राजळे, आयुक्त विजय कुलकर्णी, उपायुक्त डॉ. महेश डोईफोडे, महाराष्ट्र बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक आर. हरिकुमार, डॉ. मधुसुदन बोपोर्डीकर, मकरंद खेर, सुरेश सुपेकर, सुशील देशमुख, उद्योजक अशोक सोनवणे, अरुण कुलकर्णी, कारभारी भिंगारे, प्रवीण बजाज, मिलिंद गंधे, विनोद बजाज, मोरेश्वर कुलकर्णी, सर्वोत्तम क्षीरसागर, धनेश बोगावत, ब्रिजलाल सारडा, सुनील रामदासी आदी उपस्थित होते. संयोजक अनंत देसाई यांनी स्वागत केले. सायली देशपांडे व गीता देसाई यांनी सुत्रसंचलन केले.
कार्यक्रमासाठी ज्येष्ठ नागरीक मंच, सरगमप्रेमी मित्र मंडळ, राजु ढेरे, संतोष मेहेत्रे, नितीन चंगेडे, अभय सातपुते, अशोक जगताप आदींनी सहकार्य केले.