इचलकरंजीकर रसिकांची दिवाळीची सुरु वात सप्तसुरांच्या सहवासात व्हावी, याकरिता ‘दिवाळी पहाट’ या उपक्रमांतर्गत शुभदा बाम तांबट (नाशिक) प्रस्तुत ‘रागरंग’ हा शास्त्रीय संगीतावर आधारित िहदी-मराठी गीतांचा श्रवणीय कार्यक्रम झाला.  सलग अडीच तास उत्तरोत्तर रंगलेल्या,  वेगवेगळ्या रागांमधील, शैलीमधील दर्जेदार गीतांना रसिकांचा मनमोकळा व भरभरून प्रतिसाद मिळाला.
मनोरंजन मंडळ महिला विभाग, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब सेंट्रल, प्रेरणा महिला मंच आणि रोटरी क्लब टेक्स्टाईल सिटी यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन गणेशमूर्तीस पुष्पहार अर्पण करून कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी आवाडे म्हणाले की, सांस्कृतिक कार्यक्रम ही समाजाच्या आणि नागरिकांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची गोष्ट आहे.
वक्रतुंड महाकाय गणेशस्तवन व गुरु वंदना यांनी या कार्यक्रमाचा आरंभ झाला.‘मागे उभा मंगेश’, ‘प्रभाती सूर’,‘मोरी गगर’, ‘तुज मागतो मी आता’, या शुभदा तांबट यांच्या गीतांनंतर सहगायक मििलद सरवटे यांनी ‘जब दिप जले आना’, ‘जिंदगी भर नहीं भूलेगी’ ही गीते सादर केली. त्यानंतर ‘माझे जीवन गाणे’, ‘तुला पाहते मी’, ‘शतकांच्या यज्ञातुनी.’ आदी गाणी तांबट यांनी उत्कटपणे सादर केली. ‘एक होता विदूषक’ या चित्रपटातील ‘लाल पैठणी’ ही बैठकीची लावणी कार्यक्रमाचे वेगळेपण जपणारी होती. . पसायदान सादर करून त्यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
 प्रा.सचिन कानिटकर यांनी आपल्या ओघवते, मिश्कील तसेच माहितीपूर्ण निवेदन कार्यक्रमाची रंगत वाढवित होते
श्रीकांत हावळ यांचे नेपथ्य व रंगमंच सजावट रसिकांची दाद घेणारी होती. संजय काशीद यांनी काढलेली रांगोळीही लक्ष वेधून घेणारी होती. एरवी सततची धावपळ आणि मनमोकळ्या भेटीगाठी कठीण झालेल्या या दिवसात ‘दिवाळी पहाट’ या उपक्रमाने रसिकांना सुरेल आनंद दिला. पहाटेची प्रसन्न वेळ, सुवासिक अत्तर, गजरा देऊन केले जाणारे स्वागत, सर्वत्र तेवणाऱ्या पणत्या या सर्वामुळे कार्यक्रमासाठी एकदम पूरक असे वातावरण तयार झाले होते. कोल्हापूर येथील श्रीमंत घोरपडे नाटय़गृहात झालेल्या या कार्यक्रमास रसिकांचा मोठा, उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.