केवळ भारंभार चित्रपट निर्मिती हे चित्रपटसृष्टीच्या यशाचं गमक असू शकत नाही. जेव्हा दर्जेदार, आशयघन चित्रकृतीला व्यावसायिक यश मिळतं आणि समीक्षक-प्रेक्षकांकडूनही तो नावाजला जातो, तिकिटांसाठी रांगा लावून तो पाहिला जातो, चित्रपटातील गाणी सहज लोकांच्या ओठांवर रुळू लागतात, तेव्हा कुठे चैतन्याचे नवे वारे वाहू लागलेत याची जाणीव होते. यंदाच्या दिवाळीत मराठी चित्रपटसृष्टीतही असा नवचैतन्याचा आनंद, जोश भरभरून वाहतो आहे. कारण, यावर्षी व्यावसायिक यश आणि आशयघन चित्रपटांची निर्मिती ही दोन्ही समीकरणे मराठी चित्रपटांसाठी अगदी चपखल जुळून आली आहेत. यावर्षीचा सर्वात व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी आणि सुपरहिट चित्रपट म्हणून ‘दुनियादारी’ने नवा इतिहास रचला आहे. १५व्या आठवडय़ातही ७० थिएटर्समधून या चित्रपटाचे दिवसाला ९० शो दाखवले जात आहेत. शिवाय, २६ कोटींची कमाई या चित्रपटाने केली आहे. आणखी एक म्हणजे लोकांना आणि समीक्षकांनाही आवडलेल्या या चित्रपटाची गाणी हाही एक स्वतंत्रपणे विचार करायला लावणारा विषय झाला आहे. चित्रपटसृष्टीतील जाणकारांच्या मते ‘दुनियादारी’ चित्रपटातील गाण्यांनी एक नवा संदेश दिला आहे तो म्हणजे चित्रपटाचे संगीत-गाणी यावर मेहनत घेतली तर तरुणाईचा एक मोठा वर्ग चित्रपटांकडे सहज आकर्षित होतो, हे या चित्रपटावरून म्हणता येईल.
एकीकडे ‘दुनियादारी’सारख्या चित्रपटाला मिळालेले अमाप व्यावसायिक यश आणि दुसरीकडे ‘मामि’सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिग्दर्शक नागनाथ मंजुळेला ‘फँड्री’ चित्रपट पाहून प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दिलेली सलामी हाही तितकाच कौतुकाचा विषय आहे. ‘इफ्फी’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील ‘इंडियन पॅनोरमा’ विभागात एकाचवेळी पाच मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. फिचर फिल्म गटामध्ये नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँण्ड्री’, सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘अस्तु’ आणि सुप्रसिद्ध छायालेखक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित व अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकाविलेले दिग्दर्शक मंगेश हाडवळे लिखित व प्रस्तुत ‘टपाल’ हे तीन चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. तर प्रांतिक नारायण बसू दिग्दर्शित ‘मकारा’, अविनाश देशपांडे दिग्दर्शित ‘व्ही. बाबासाहेब लाइफ इन फूल ओपन’ असे दोन मराठी चित्रपट नॉन फिचर फिल्म गटामध्ये दाखवण्यात येणार आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर झालेली मराठी चित्रपटांची निवड हे नक्कीच आपल्याकडे दर्जेदार चित्रपटांची निर्मिती वाढत चालले असल्याची खूण आहे.  मराठी चित्रपटांना व्यावसायिक पातळीवर मिळणारे यश आणि चित्रपटांमधून हाताळले जाणारे वैविध्यपूर्ण विषय यामुळे गेल्या वर्षभरात कॉर्पोरेट निर्मिती संस्था, मोठमोठे निर्माते, हिंदीतील अभिनेत्यांचा मिळालेला पाठिंबा यामुळे चित्रपट निर्मितीचा मार्ग सुकर झाला. त्याचमुळे असेल पण गेल्या वर्षभरात आलेल्या मराठी चित्रपटांमध्ये अनेकविध प्रयोग केले गेले आणि ते प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरले. फॉक्स स्टारसारख्या प्रथितयश निर्मिती संस्थेशी हातमिळवणी करत दिग्दर्शक महेश कोठारे यांनी पहिला थ्रीडी ‘झपाटलेला’ चित्रपट दिला. गाजलेल्या नाटकांवर बेतलेले ‘श्रीमंत दामोदरपंत’ आणि ‘टाईमप्लीज’ हे दोन्ही चित्रपट लोकांना आवडले. याशिवाय, अक्षय कुमारच्या ‘ग्रेझिंग गोट’मुळे ‘७२ मैल’ सारखी कादंबरी चित्रपटरूपात उतरली, तर रितेश देशमुखच्या पाठिंब्याने दिग्दर्शक रवी जाधवने लैंगिक शिक्षणासारखा अनवट विषयही ‘बीपी’च्या माध्यमातून यशस्वी करून दाखवला. याशिवाय, ‘नारबाची वाडी’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ असे अनेक चांगले चित्रपट यावर्षी मराठीत फक्त दिसले नाहीत तर त्यांनी प्रेक्षकांची मनेही जिंकली. खऱ्या अर्थाने यावर्षी मराठी चित्रपट दिग्दर्शकोंना प्रेक्षकांची नाडी अचूक पकडता आली आहे. यावर्षीच्या यशामुळे एकूणच मराठी चित्रपटसृष्टीत आलेल्या उत्साहामुळे, चैतन्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला आहे असे नाही, तर त्याचे चांगले परिणाम येत्या काळात पाहायला मिळतील, असा विश्वासही चित्रपटकर्मीकडून व्यक्त होतो आहे.

*मराठी प्रेक्षक हा चोखंदळ, प्रगल्भ आणि बुद्धिमान आहे. तो पूर्वीपासूनच तसा होता. पण, त्यांची प्रगल्भ वैचारिक भूक भागवू शकेल असे मराठी चित्रपट मधल्या काळात तयारच होत नव्हते म्हणून प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांसाठी नो एन्ट्रीचा बोर्ड लावला होता. आता कुठे मराठी चित्रपटकर्मीनी प्रेक्षकांना गृहीत धरणे थांबवले आहे आणि ते प्रयोगशीलतेवर भर देत आहेत. त्यामुळे मराठी चित्रपटांचा ट्रेण्ड बदलला आहे असे म्हणत नाही, पण ते एक वेगळा ट्रेण्ड निर्माण करण्याच्या प्राथमिक टप्प्यावर आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांत ‘काकस्पर्श’, ‘नटरंग’, ‘बीपी’सारखे वेगवेगळे विषय प्रेक्षकांनी उचलून धरले. ‘दुनियादारी’ हा त्यातला मैलाचा दगड होता म्हणजे त्या बदलाचे प्रतीकात्मक यश होते असे म्हणता येईल आणि त्याचा पुढचा टप्पा हा ‘फँड्री’चा असेल, असा विश्वास वाटतो. 
निखिल साने,  व्यवसाय प्रमुख – झी मराठी

* ‘इफ्फी’ महोत्सवात इंडियन पॅनोरमा या विभागात दाखविण्यात येणाऱ्या विविध भारतीय भाषांतील चित्रपटांचे महत्त्व जगभरातील चित्रपट महोत्सवांना वाटते. यातली महत्त्वाची अधोरेखित करण्याजोगी बाब म्हणजे गेल्या काही वर्षांपासून मराठी चित्रपटांचा या विभागातील सहभाग वाढत आहे. आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे मल्याळी, बंगाली चित्रपटाइतकीच मराठी चित्रपटांची संख्याही असते. परंतु, इंडियन पॅनोरमात अंतिम निवड  झालेले चित्रपट त्यापैकी फक्त २-३ असतात. मराठी चित्रपट करणारे नवोदित अनेक दिग्दर्शक व कलावंत चांगल्या दृष्टिकोनातून सकस मराठी चित्रपट बनवीत आहेत. अलीकडे आलेल्या ‘टाइम प्लीज’ चित्रपटामध्येही प्रभावी संवादांनी चित्रपटाची ताकद वाढते हे दाखवून दिले होते. मराठीत चांगल्या चित्रपटांची निर्मिती व्हावी असे सर्वानाच वाटते. परंतु, त्यादृष्टीने नवा विचार व त्यानुसार कृती करणारे तरुण दिग्दर्शक-लेखक-कलावंतांचे चित्रपट संख्येने वाढायला हवेत. ‘दुनियादारी’नंतर आलेल्या ‘टाइम प्लीज’, ‘नारबाची वाडी’ सारख्या चित्रपटांनीही चांगला गल्ला गोळा केल्याचे वाचून आनंद झाला. केवळ आंतरराष्ट्रीय महोत्सवात आपल्यासाठी विभाग आहे म्हणून वाट्टेल तो चित्रपट पाठविणे हेही अयोग्यच हे संबंधितांसाठी नमूद करणे अगत्याचे ठरते.
अशोक राणे, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक

* मराठी चित्रपटांना सध्याचा काळ खूपच सुंदर आणि अभिमान वाटेल असा आहे. आज वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रतिभावंत मराठी चित्रपटसृष्टीत एकवटले आहेत, त्यामुळेच इतकी सर्जनशील चित्रपट निर्मिती आपल्याला पाहायला मिळते आहे. आता मधुरसारख्या दिग्दर्शकालाही वर्षांला एक तरी मराठी चित्रपट करावासा वाटेल, हे मराठी चित्रपटांचे भविष्य आहे. एक चित्रपट वितरक म्हणून एकच म्हणणे आहे की, एकावेळी दोन-तीन मराठी चित्रपट लावू नका. कारण, मराठी प्रेक्षक एकावेळी दोन-दोन मराठी चित्रपट पाहत नाही. मग आपल्यातच स्पर्धा कशाला? स्पर्धा करायची असेल तर ती बॉलीवूड आणि हॉलीवूडच्या चित्रपटांशी करा. एकमेकांना योग्य तो वेळ द्या..

गिरीश वानखेडे, सिनेमॅक्सचे उपमहाव्यवस्थापक
* ‘फँड्री’ हा माझा चित्रपट ‘मामि महोत्सवा’नंतर आता धरमशाला येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात व त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात अबुधाबी येथे व त्यानंतर भारत सरकारच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील इंडियन पॅनोरमा विभागात दाखविण्यात येणार आहे. ‘पिस्तुल्या’ हा लघुपट केल्यानंतर नकळतपणे चित्रपट करण्याकडे खेचला गेलो. मुळात चित्रपट माध्यमातूनच ‘व्यक्त’ व्हायचे असे काही ठरविले नव्हते. दलित शाळकरी मुलगा आणि त्याचे उच्चवर्णीय मुलीवर असलेले प्रेम. त्याची स्वप्नं आणि त्याच्यातील न्यूनगंडाची भावना याचा संघर्ष पडद्यावर मांडला आहे. आपल्या मनातली गोष्ट कॅमेऱ्याच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर मांडणे याचा ध्यास घेतला आणि तो विविध ठिकाणी चित्रपट निवडला गेल्याने यशस्वीही ठरला असे वाटते.
 नागराज मंजुळे

*
मराठीत कायम दर्जेदार चित्रपटनिर्मिती होत होती आणि त्यांना कित्येकदा राष्ट्रीय स्तरावर मान्यताही मिळालेली होती, पण एकंदरितच चित्रपटनिर्मितीच्या तुलनेत या चित्रपटांची टक्केवारी कमी असल्यामुळे त्याची नोंद घेतली जात नव्हती. आता हे चित्र बदललं आहे. मराठी चित्रपटांच्या प्रत्येक कामगिरीबद्दल आता बोललं जातं आहे. त्यांच्या यशाला ओळख मिळाली आहे यामागे माध्यमांनी त्याकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन फार मोलाचा आहे, असे वाटते. मधल्या काळात सांस्कृ तिकदृष्टय़ा दर्जेदार चित्रपट नव्हते त्यामुळे चोखंदळ प्रेक्षक व सामान्य प्रेक्षकांची होती. सामान्यांच्या मनाला रिझवू शकेल असा व्यावसायिक आनंद देणारा चित्रपटही बनत नव्हता. जे काही विनोदी चित्रपट होते ते त्याचे समाधान करू शकत नव्हते. आता हा जो मधला प्रेक्षक आहे त्याच्यासह ‘अरे हा सगळ्यांना आवडलेला चित्रपट आहे बघून तर येऊयात’ किंवा ‘अमुक एक चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे, काय दाखवलंय ते तरी बघायला हवं..’ असा विचार करून प्रेक्षक चित्रपटांकडे परतत आहेत. मराठी चित्रपटांबद्दलच्या अशाच स्वाभिमानाने प्रेक्षक जर प्राधान्याने मराठी चित्रपट बघू लागला तर नक्कीच हे चित्र बदलेल.
सुनील सुकथनकर, दिग्दर्शक