08 August 2020

News Flash

दिवाळी पाडवा : हळुवार नात्याची दृढ जपणूक

कार्तिक महिन्याचं आगमन होत आहे हे कळायला कॅलेंडरमध्ये डोकवावं लागत नाही. पहाटेचा सुखद गारवा, गार वाऱ्याची मंद झुळूक, स्वच्छ निळेभोर आकाश, त्यावर तरंगणारे पांढऱ्याशुभ्र ढगांचे

| November 13, 2012 11:03 am

कार्तिक महिन्याचं आगमन होत आहे हे कळायला कॅलेंडरमध्ये डोकवावं लागत नाही. पहाटेचा सुखद गारवा, गार वाऱ्याची मंद झुळूक, स्वच्छ निळेभोर आकाश, त्यावर तरंगणारे पांढऱ्याशुभ्र ढगांचे आणि पक्ष्यांचे थवे, चुरचुरीत नवीकोरी स्वच्छ हवा असा सगळा माहौल कार्तिक महिन्याची चाहूल देतच असतो. या दिवसांत पावसाळय़ानंतरचं जमिनीचं हिरवंगार रूप ठायीठायी नजरेत भरतं. या हिरव्यागार गालिच्यावर पिवळय़ाजर्द सोनकीच्या फुलांची, झेंडूच्या नारिंगी-पिवळय़ा रंगांची आणि निळय़ा, गुलाबी, जांभळय़ा रानफुलांची वेलबुट्टी उठून दिसत असते. सर्व वातावरणातच एक ताजेपणा, नावीन्य भरून राहिलेलं असतं.  एरवी आपल्या देशाला ठळक तीन मोसमांचं सौंदर्य लाभलेलं आहे. चैत्रपालवीपाठोपाठ येणारं वैशाखातलं रणरणीत, झगझगीत ऊन आणि त्याला प्रतिसाद देणारे लालजर्द पाकळय़ांचे गुलमोहोर, लालभडक ज्वालाफुलांचे मुकुट ल्यायलेले पळसवृक्ष, जांभळय़ा मोहोराचे नीलमोहोर, पिवळय़ाजर्द फुलांचे झुंबरासारखे घोस लटकलेले कॅशिया यांचा बहर नजरेत मावत नाही इतका उत्फुल्ल असतो. त्यानंतर येणाऱ्या पावसाळय़ाचं बहारदार रूप तर शतकानुशतकं कित्येक कवींची प्रतिभा जागवणारं ठरलं आहे. कधी हलकाहलका शिडकावा करणारा, तर कधी मुसळधार बरसणारा हा पाऊस वैशाख वणव्यानंतर धरित्रीला थंडावा देतो.
आणि त्यानंतर सुरू होतो थंडीचा मोसम. आपल्याकडे वर्षांतले पावसाळय़ातले पावसाची झड लागून राहिलेले काही दिवस वगळता जवळजवळ आठ-नऊ महिने हवेत उष्णताच असते. अपवाद फक्त थंडीच्या दोन-अडीच महिन्यांचा आणि आपल्या संपूर्ण देशात पार दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंतचा वर्षांतला हा सगळय़ात सुंदर मोसम कार्तिक महिन्यापासून सुरू होतो. म्हणूनच कार्तिक, मार्गशीर्ष आणि पौष या महिन्यांची आपण अगदी वाट पाहात असतो.
आणि आपल्याकडच्या कृषिप्रधान संस्कृतीमुळे पौराणिक महत्त्व दिले गेलेले आपले सर्व सण-वार या तीन ठळक मोसमांवरच प्रामुख्यानं आधारलेले आहेत. अंधकाराचा नाश करून दिव्यांचा प्रकाश उजळवणारा दीपावलीचा सण याच थंडीच्या मोसमाच्या सुरु वातीलाच येतो. दिवाळीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन यानंतर येणारा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस पाडवा म्हणून साजरा केला जातो हे आपल्याला माहीत आहेच. पूर्वापार हा दिवस नव्या सुरु वातीचाच मानला जातो.
विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य यानं शकांचं आक्रमण परतवून लावलं, त्यांचा पाडाव केला, त्या विजयाचं प्रतीक म्हणून विक्रमादित्यानं विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे. इ. स. पूर्व काळातल्या संस्कृतीच्या वैभवाचं, सर्वागीण सभ्यतेचं आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचं हे एक उदाहरण आहे.
हा दिवस बलिप्रतिपदा म्हणूनही ओळखला जातो. बळीराजासारख्या प्रजाहितदक्ष, दानशूर, पण अहंमन्य बनलेल्या राजाला बटु वामनाने तीन पावलांत भानावर आणलं. त्याचा हा दिवस मानला जातो. याचबरोबर नव्या गोष्टींची, उपक्रमांची सुरुवात करण्याच्या वर्षांतील साडेतीन मुहूर्तापैकी हा दिवस अध्र्या मुहूर्ताचा समजला जातो हे आपण सर्वजण जाणतोच.
पौराणिक महत्त्व असलेला आणि कृषिप्रधान संस्कृतीचं प्रतिबिंब दाखवणारा कार्तिक महिन्याचा हा आरंभदिन आणखीही एका दृष्टीनं महत्त्वाचा आहे. परंपरेनं पती आणि पत्नी यांनी परस्परांविषयीची कृतज्ञता व्यक्त करून आपल्या नात्याला एक नवं, अर्थपूर्ण वळण देण्याचा हा दिवस आहे. आपल्या मनात दिवाळीतल्या पाडव्याविषयीचं एक पारंपरिक चित्र, एक संकल्पना असते. वस्त्रालंकारांनी सजलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते आहे. निरांजनातल्या ज्योतींचा मंद प्रकाश दोघांच्याही चेहऱ्यांवर पडला आहे आणि त्यात परस्परांविषयीचा विश्वास, प्रेम आणि आदर लख्ख दिसत आहे. आजही हे चित्र बदललेलं नाही. स्त्रीनं पुरु षांच्या बरोबरीनं किंवा काकणभर अधिकच सर्वच क्षेत्रांत यशाची शिखरं गाठली आहेत. तरी आपलं घरकुल प्रेमानं सांभाळणारी, आपल्या मुलांचं संगोपन डोळय़ांत तेल घालून करणारी, कुटुंबातलं सामंजस्य, नात्यांतला स्नेह यांची जोपासना जाणीवपूर्वक करणारी ही तिची भूमिका ती आजही तितक्याच जिव्हाळय़ानं साकारते आहे. तिची ही शक्ती, तिचं हे सामथ्र्य जाणूनच पती त्याच्या कृतज्ञतेचं प्रतीक म्हणून तिला पाडव्याच्या दिवशी ओवाळणी म्हणून तिची आवडती एखादी भेटवस्तू देतो.
कालानुरूप पती-पत्नी यांच्या नात्यात बदल होतो आहे. ते आता अधिकाधिक  बरोबरीचं, सामंजस्याचं होतं आहे. मुळात विश्वास, प्रेम यावर आधारलेलं पती-पत्नीचं नातं निभवायला सर्वात कठीण! एक उत्तम सहजीवन साकारणं ही एक कौशल्याची गोष्ट आहे. त्याकरिता दोघांनाही अनेक कसोटय़ांतून सतत पार पडावं लागतं.  खरंतर प्रत्येकच नातं सतत बदलत असतं. ते कधीच एका जागी स्थिर, अडकलेलं असू शकत नाही. आजूबाजूची बदलती परिस्थिती, बदलता काळ, वाढत जाणारं वय, अनुभवांची वाढती शिदोरी, त्यानं येणारी जाण, यानं खरं म्हणजे कुठलंही नातं अधिकाधिक प्रगल्भ होत गेलं पाहिजे. मग त्याला पती-पत्नीच्या नात्याचा अपवाद तरी कसा असेल? पण हे नातं अनेक स्तरांवरचं आणि आयुष्यभराच्या एकमेकांच्या सततच्या साथीचं असल्यानं काहीवेळा ते अधिक गुंतागुंतीचं आणि अवघड बनून जातं. परस्परांविषयीचे समज-गैरसमज, संशय, एकमेकांना गृहीत धरण्याची सवय, वरचढ ठरण्याची वृत्ती अशा अनेक गोष्टींचं ग्रहण या नात्याला लागू शकतं. या सर्व झालेल्या चुका विसरून नव्यानं या नात्याला उजाळा देण्याचा मन:पूर्वक प्रयत्न पाडव्याच्या दिवशी केला जातो.
सहसा पती-पत्नीच्या सहजीवनाची सुरु वात खूप आकांक्षांनी, उत्साहानं भारून केली जाते. नात्यातला हा सुरुवातीचा काळ एकमेकांच्या सहवासात हरवण्याचा असतो. एकमेकांशिवाय काहीही करायला सुचत नाही असं वाटण्याचा असतो. मग हळूहळू व्यावहारिक जगात एक जोडपं म्हणून जगायला लागताना, वावरताना एकमेकांच्या स्वभावातले कंगोरे बोचायला लागतात. शिवाय कुटुंबात राहताना केवळ एकमेकांपुरतंच हे नातं मर्यादित राहात नाही. त्याला जोडून इतर अनेक नात्यांचा गोफ होतो आणि खरी परीक्षा सुरू होते.
विशीतलं हे जोडपं तिशीत प्रवेश करतं. त्यांचे जगण्याचे प्राधान्यक्रम बदलतात. पुढची  जवळजवळ वीस र्वष वयानं ज्येष्ठ होत जाणाऱ्या आई-वडिलांची जबाबदार मुलं आणि वाढत्या वयाच्या मुलांचे जबाबदार, सुजाण आई-बाबा अशी दुहेरी भूमिका निभावण्याची त्यांची कसरत सुरू राहते. शिवाय, स्वत:ला काय करायचं आहे, नोकरी-व्यवसायात कोणती उद्दिष्टं गाठायची आहेत याचं भान ठेवून तीही धडपड चालूच असते. आर्थिक जबाबदारीचं आव्हान याच काळात सर्वाधिक पेलावं लागतं. या सर्व धडपडीत पती-पत्नीत परस्पर सामंजस्य आणि आदर असण्याची नितांत गरज असते. कारण घराबाहेरच्या आणि आतील परिस्थितीच्या ताणतणावांमुळे काहीवेळा अकारण चिडचिड, राग, संताप यांचे उद्रेक होण्याची शक्यता असते. अशा वेळी जोडीदारानं या लक्षणांमागचं कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि प्रसंगानुरूप स्वत: शांत राहून समजुतीनं घेण्याची गरज असते.
सुरु वातीला हे जमत नाही. दोन्ही बाजूंनी तीव्र मतप्रदर्शन झाल्यानं वाद-भांडणं होऊ शकतात. पण जसजसं सहजीवन परिपक्व होत जातं तसतशी एकमेकांच्या स्वभावाची, सामर्थ्यांची, उणिवांची खरी ओळख पटत जाते आणि त्यानुरूप जमवून घेण्याची सवयही दोन्ही बाजूंनी लागते. या सर्व प्रवासात पती आणि पत्नी हे नातं बरोबरीचं आहे याची जाणीव मात्र या दोघांना आणि कुटुंबातील इतरांनाही असावी लागते.
आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं झालं तर मघाशी म्हटल्याप्रमाणे कामांची पारंपरिक विभागणी आता हळूहळू मोडीत निघते आहे. घर सांभाळणं, मुलांचं संगोपन, व्यक्तिगत ध्येयप्राप्ती, आव्हानं आणि अर्थार्जन या सर्व आघाडय़ांवर परस्पर संमतीनं आताच्या नव्या कुटुंबात वाटणी केली जात आहे. एप्रन लावून झटपट ब्रेक फास्ट बनवून टेबलवर मांडणारा किंवा कामानिमित्त पत्नी बाहेरगावी गेलेली असताना घराची व्यवस्था, मुलांचं सगळं काही उत्तम रीतीनं सांभाळणारा हसतमुख नवरा आता दुर्मिळ राहिलेला नाही. बदलत्या काळातल्या बदलत्या कुटुंबव्यवस्थेत पती-पत्नीच्या नात्यांचे आयाम बदलत चालले आहेत आणि तरीही पाडव्याच्या ओवाळणीमागची भावना मात्र तशीच बावनकशी सोन्यासारखी अस्सल लखलखीत स्नेहाची, प्रेमाची आहे. ती तशीच टिकून राहावी म्हणून एकमेकांना आहोत तसं स्वीकारणं, एकमेकांच्या सामर्थ्यांविषयीचं कौतुक करणं, एकमेकांना सांभाळून घेणं, एकमेकांना गृहीत न धरणं, एकमेकांना अवकाश देणं, घरामध्ये काही मूल्य आणि उद्दिष्टं यांची एकत्रित जपणूक करणं अशा काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्या लागतात.
असं केल्यानं प्रेमाचं एक वर्तुळ बनतं आणि ते अख्ख्या घरकुलात पसरत जातं. त्याचं प्रतीक म्हणून पाडवा साजरा केला जावा. तो केवळ एक पती-पत्नी डे नसावा, तर केवळ आनंदानं एकमेकांकरताच म्हणून काही गोष्टी करण्याचा असावा. सतत नव्यानं पती-पत्नीतल्या नात्याला दृढ करणारा, एकमेकांच्या साथीनं वाढण्याचा, परस्परांविषयीचं प्रेम, विश्वास आणि आदर वृद्धिंगत करणारा असावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2012 11:03 am

Web Title: diwali padwa careness of relationship to make strong
Next Stories
1 दीपोत्सव नव्हे अक्षर फराळाचा शब्दोत्सव
2 प्रेमा काय देऊ तुला
3 आता सुरेल संगीत मैफलींनी उगवते दिवाळी पहाट..!
Just Now!
X