संजीवनी मित्रमंडळाच्या वतीने दिवाळी पाडव्यानिमित्त आयोजित पाडवा पहाट मैफलीत पं. राजा काळे यांच्या बहारदार भावसंगीत व अभंगांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. वैष्णवी मंगल कार्यालयात झालेल्या या संगीत मेजवानीस शहरातील रसिकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.
वेदशास्त्रसंपन्न बाळुगुरू आसोलेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने संगीत मैफलीचे उद्घाटन झाले. सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर, माधवराव आजेगावकर, अॅड. किरण दैठणकर यांची उपस्थिती होती. बाळुगुरू आसोलेकर यांनी या वेळी पाडव्याचे महत्त्व विशद केले. संगीत आराधना व श्रवण जीवन आनंदमय करणारे असल्याचे नमूद करीत अध्यात्म व संगीतातून जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होतो, असे सांगितले. डॉ. परळीकर यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले. यानिमित्ताने चांगल्या गायकांना ऐकण्याची संधी परभणीकर रसिकांना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. संयोजक आनंद भरोसे यांनी दिवाळीनिमित्त रसिकांना संगीतमय मेजवानी देण्याचा उद्देश जाहीर केला. संगीत मैफलीत पं. राजा काळे यांनी विविध अभंगरचना, भावसंगीत सादर केले. सूत्रसंचालन मल्हारीकांत देशमुख यांनी केले. पंकज लाठकर यांनी आभार मानले.