नेहमी नवतंत्रज्ञानाचा आविष्कार घडविणाऱ्या इचलकरंजीतील डीकेटीई शिक्षण संस्थेत गुरुवारी जुन्या काळातील अस्सल ग्रामीण संस्कृतीचा बाज अनुभवायला मिळाला. जत्रा, सण, विवाह सोहळा, बाजारहाट असा हरवत चाललेला जामा-निमा पाहताना आजची टेक्नोसॅव्ही पिढी हरवून गेली होती. निमित्त होते संस्थेच्या वार्षिक स्नेह सोहळ्याचे.
डीकेटीईच्या प्रतिवर्षी होणाऱ्या स्नेह सोहळ्यात विशिष्ट विषयाला वाहिलेल्या मिरवणुकीचे वैशिष्टय़ असते. ही मिरवणूक पाहण्यासाठी शहराच्या दुतर्फा शहरवासीयांची गर्दी लोटलेली असते. यंदा मात्र या मिरवणुकीला तांत्रिक कारणामुळे परवानगी मिळू शकली नाही. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थी, प्राध्यापक, सांस्कृतिक विभाग यांनी ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडविण्याचा ध्यास घेतला. त्यातूनच भव्य राजवाडय़ाच्या जोडीला खेटूनच ग्रामीण संस्कृती अवतरली होती. दख्खनचा राजा जोतिबा जिवंत रूपात साकारला होता. त्याच्यासमोरच ३५ फुट उंचीची सासणकाठी नाचवत विद्यार्थी गुलालात न्हाऊन नाचत होते. जोतिबाचे दर्शन घेतल्यानंतर पहिले पाऊल पडते ते जुन्या काळातील खेडेगावात. शेळ्या-मेंढय़ांसह थाटलेल्या धनगर वाडय़ातून पुढे जाऊ लागतो तसे पाटलाचे घर, कुंभारवाडा, बारा बलुतेदार, खटय़ाळ पोरांची शाळा, वासुदेव, मंगळागौरीचा खेळ, चरक्यावर आकाराला येणारा जुन्या काळातील वस्त्रोद्योग अशा घटनांनी लक्ष वेधून घेतले जाते.
ग्रामपंचायतीचा कारभार आणि त्यासाठी होणारी निवडणूक ही मोठी मजेची गोष्ट होती. गावचावडी, तेथे भरणारा बाजार, कुंभारवाडा, दुर्मिळ झालेले लाकडी नांगर, पितळी भांडी, शेतीची औजारे, लाकडी खाटले, दिवाळी सणातील किल्ला, वारुळासह नागपंचमी याचा जामानिमाही होता. विठ्ठलाच्या मंदिरासमोर धार्मिक वातावरण थाटले होते. वारकरी सांप्रदायाची िदडी, पालखी, भजन यामुळे मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. तर लग्न-सोहळ्याच्या ठिकाणी गोंधळ, सत्यनारायण पूजा, वधू-वर-वधुपक्षाची लगबग, रुखवत, वरात वऱ्हाडी या साऱ्यांची लगीनघाई उडाली होती. डय़ाजल विथ २०१४ अंतर्गत ग्रामीण जीवनाच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्र्या या उपक्रमात सुमारे ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते. एरव्ही हातात सबमिशनची जनरल आणि फाईल घेऊन फिरणारे नव्या पिढीतील विद्यार्थी गाव साकारण्याच्या कल्पनेत इतके समरस झाले होते की, कुणी हाती नांगर घेऊन शिवार फुलवू पाहत होता, तर कोणी गावच्या जत्रेत आनंदाने नाचू बागडू लागले होते. कणेरी मठापासून स्फूर्ती घेऊन खरे-खुरे ग्रामजीवन राजवाडय़ात आकाराला आले होते.
प्राचार्य पी. व्ही. कडोले यांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. के. व्ही. शहा, प्रा. सचिन कानिटकर, प्रा. ए. व्ही. अवसरे, प्रा. ए. आर. बलवान, प्रा. अश्विनी रायबागे, विद्यार्थी प्रतिनिधी केतन पाटील, संजय िशदे, कपिल पाटील, सुशांत गंगाधरे, गौरव दंडगे, सनी जकाते, पूजा पाटील, प्रियांका चौगुले, कीर्ती तापोळे यांच्या प्रयत्नाने या उपक्रमाला रंग आला होता. संस्थेच्या सचिव सपना आवाडे यांनी उपक्रमाची पाहणी करून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.