तरुणीच्या बलात्कार व गर्भपातप्रकरणी उंब्रज पोलिसांनी डीएनए चाचणीसाठी सुमारे साडेचार महिन्यांचा गर्भ ताब्यात घेतला आहे. दरम्यान, कराडमधील ज्या रुग्णालयात परिचारिका कामास होती, तेथील व्यवस्थापनाची नजर चुकवून गर्भपातासाठी वापरली जाणारी गोळी परिचारिकेने आपल्याजवळ ठेवली होती. पुढे त्याच गोळीचा वापर करत तरुणीचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला गेला अशी माहिती समोर आली आहे.
नागेश मल्लाप्पा पुजारी या भोसलेवाडीतील तरुणासह मुमताज याकूब मुल्ला, पार्वती राम औताडे, शारदा लक्ष्मण सुतार या तीन परिचारिकांना उंब्रज पोलिसांनी गजाआड केले आहे. सर्व संशयितांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिले असून, या चौघांकडे कसून तपास सुरू आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. गर्भपात करण्यासाठी पुजारीकडे परिचारिकांनी १५ हजारांची मागणी केली होती. तसेच गर्भपात केल्याचे कोणाला समजू नये म्हणून मुमताज मुल्ला हिचे घर निवडण्यात आले. गर्भपातासाठी एका गोळीचा वापर केला गेला, मात्र यासाठी वापरलेली गोळी परिचारिका ज्या कराडमधील रुग्णालयात कामास होत्या त्या रुग्णालयातून मिळविण्यात आली होती. गोळी आपल्याजवळ आहे याची रुग्णालय व्यवस्थापनास माहिती होऊ नये म्हणून परिचारिका मुल्ला हिने दक्षताही घेतली होती अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. या सर्व माहितीची सत्यता पडताळण्याची कार्यवाही सुरू असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी चार ते साडेचार महिन्यांचा गर्भ ताब्यात घेतला असून, आता डीएनए चाचणी केली जाणार असल्याचे देवकर यांनी स्पष्ट केले.