ज्ञानेश्वरी आणि तुकारामांची गाथा ही भारताची जागतिक ओळख आहे, आपला हा जागतिक वारसा प्रत्येकाच्या घरात असला पाहिजे, त्यातून सर्वागांचा बोध घेतला पाहिजे असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी येथे बोलताना केले.
राज्य मराठी भाषा विभाग, साहित्य व संस्कृती मंडळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नगरला आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवाचे उदघाटन पठारे यांच्या हस्ते आज झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव होते. ज्येष्ठ लेखक व अनुवादक विलास गीते, विभागीय माहिती उपसंचालक देवेंद्र भुजबळ यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पठारे म्हणाले, आत्तापर्यंत आपण अभंगांची ताकद व श्रवणभक्ती यावरच तरलो, यापुढे त्यावर भागणार नाही. हे माहितीचे युग आहे, त्या आधारे ज्ञानात सातत्याने भर टाकणे गरजेचे असून ही प्रत्येकाची स्वत:चीच जबाबदारी आहे. राज्य सरकारच्या या ग्रंथोत्सव उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.
गीते म्हणाले, चांगला वाचक हा भावी लेखक असतो. वाचनातून इतरांची शैली समजावून घेतानाच हळूहळू आपलीही शैली निर्माण होते. इंटरनेट किंवा ई-बुकपेक्षा खरी मजा पुस्तके विकत घेऊन वाचण्यातच आहे. पुस्तकांशी मैत्री करून प्रत्येकाने स्वतंत्र ग्रंथालय निर्माण करावे असे आवाहन त्यांनी केले. डॉ. जाधव म्हणाले, चांगला समाज व नैतिकता निर्माण करण्याची ताकद ग्रंथात आहे. चांगले संस्कार ग्रंथातूनच मिळू शकतात, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्याचा पाया संत साहित्यातच होता.
उपसंचालक यांनी प्रास्तविक केले. हा ग्रेथोत्सव म्हणजे छोटेखानी साहित्य संमेलनच आहे असे ते म्हणाले. प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दिलीप गवळी यांच्या हस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. नियोजन समितीचे सदस्य डॉ. प्रा. च. वि. जोशी यानी आभार मानले.
 
नगरकरांचा भरघोस प्रतिसाद
सावेडीतील रावसाहेब पटवर्धन स्मारकाच्या प्रांगणात भरवण्यात आलेल्या या ग्रंथोत्सवास पहिल्याच दिवशी नगरकरांचा भरघोस प्रतिसाद लाभला. विविध २५ प्रकाशनांचे येथे स्टॉल्स आहेत. उदघाटनाच्या आधीपासूनच या स्टॉल्सवर लोकांची झुंबड उडाली होती. परवापर्यंत (सोमवार) हा ग्रंथोत्सव सुरू आहे.