News Flash

दाखले मिळण्यासाठी लोकांना त्रास होऊ देऊ नका -थोरात

जनतेची कामे सहज व पारदर्शकपणे व्हावीत, तसेच नागरिकांना आवश्यक असलेले दाखले मिळण्यासाठी त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी

| February 5, 2014 09:02 am

जनतेची कामे सहज व पारदर्शकपणे व्हावीत, तसेच नागरिकांना आवश्यक असलेले दाखले मिळण्यासाठी त्रास होणार नाही, याची खबरदारी घ्या, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत गडचांदूर येथील समाधान योजनेंतर्गत शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी आयोजित केलेल्या मेळाव्याचे उद्घाटन बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी आमदार सुभाष धोटे, तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय आयुक्त वेणुगोपाल रेड्डी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यपालन अधिकारी संपदा मेहता, आदिवासी प्रकल्प अधिकारी आशुतोष सलील, अप्पर जिल्हाधिकारी चिंतामण डहाळकर, सभापती हिरा रणदिवे, सिंधू बारसिंगे, उपसभापती गोतावळे, सरपंच सुमन मात्राम व्यासपीठावर उपस्थित होते.
सुवर्ण जयंती राजस्व अभियान व समाधान योजनेंतर्गत जनतेला प्रशासनाकडून आवश्यक असलेले सर्व दाखले एकत्र उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे सांगताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, राज्यात ४२ लाख दाखले वितरित करण्यात आले असून राष्ट्रीय स्तरावर हा उपक्रम गिनीज बुकामध्ये नोंदविण्यात आला आहे. हा लाभ जिवती तालुक्यातील १४ गावांना मिळत असून जमाबंदी, तसेच संपूर्ण तालुक्याची तात्काळ मोजणी सुरू करण्यात येईल व जनतेला जमिनीसंदर्भातील सर्व दाखले उपलब्ध करून देण्यात येतील. कोरपना तालुक्याने संगणकीकरणामध्ये राज्यात उत्कृष्ट कार्य केले असून सर्व सातबारा संगणकीकृत देण्याचा उपक्रम अभिनंदनीय आहे. इतर तालुक्यानेही संगणकीकरणाचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात आमदार सुभाष धोटे यांनी संपूर्ण तालुक्याची जमाबंदी करावी व मोजणी करावी, त्यामुळे शेतकऱ्यांचे सातबारा कोरे राहणार नाहीत. जिवती तालुक्यात स्थानांतरित झालेल्या नागरिकांना जातीचा दाखला मिळण्यात अडचण येत आहे. त्यामुळे सहज व सुलभपणे दाखले देण्यात यावीत, अशी मागणी केली. विभागीय आयुक्त वेणुगोपाल रेड्डी यांनी सुवर्ण जयंती अभियानांतर्गत सर्व सुविधा जनतेला एकत्र उपलब्ध करून देण्यात येत असून जनतेनेही या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. म्हैसेकर यांनी या अभियानांतर्गत समाधान योजनेची जिल्ह्य़ात प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू असून १५ हजार ५८५ फेरफारीचे प्रकरणे, १ हजार ३७५ चावडी वाचन, तसेच जनतेला आवश्यक असलेली विविध प्रमाणपत्रे वितरणाचा कार्यक्रम घेण्यात आला असल्याचे सांगितले. महसूल मंत्री थोरात यांनी समाधान योजनेंतर्गत आयोजित मेळाव्याचे उद्घाटन केले. यावेळी उषा गारघाटे, गंगुबाई मांडगीरवार, सायरा बानो, नाज अली, लता जिवने यांना जमिनीचे फेरफार, जात प्रमाणपत्राचे व अनुदानाच्या धनादेशाचे वाटपही करण्यात आले. या मेळाव्यात जिल्ह्य़ातील बारा विभाग सहभागी झाले होते. शासनाच्या विविध योजनांच्या लाभ जनतेला सुलभपणे मिळवून देण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. आदिवासी प्रकल्प विभाग, आरोग्य विभाग, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महसूल विभाग, कृषी विभाग, भूमिअभिलेख आदी विभाग सहभागी झाले होते.
सीमावादाचा नवाच वाद
महाराष्ट्रातील चौदा गावात आंध्रप्रदेशची लूडबूड खपवून घेणार नाही, असा इशारा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिवती तालुक्यात आयोजित कार्यक्रमात दिला. गेल्याच आठवडय़ात आदिलाबादचे खासदार राठोड यांनी महाराष्ट्र-आंध्रप्रदेश सीमावादात अडकलेली चौदा गावे आंध्रप्रदेशात सामावून घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनातून केली होती. आता महाराष्ट्राचे महसूल मंत्र्यांनी ही लुडबूड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 9:02 am

Web Title: do not cause people for getting certificates thorat
टॅग : Thorat
Next Stories
1 ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणाऱ्या पर्यटकांची संख्या घसरणीवर
2 ऐतिहासिक गाविलगडाकडे पुरातत्व खात्याचेही दुर्लक्ष
3 नागपूर जिल्ह्य़ात दीड लाख मतदार वाढले!
Just Now!
X